मनोज जरांगेंनी उपचारासाठी सहमती दर्शवली:सुरेश धसांनी मंगळवारी रात्री उपोषस्थळी दिली भेट, आग्रहानंतर घेतले सलाइन

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली. मंगळवारी रात्री उशिरा त्यांनी आमदार सुरेश धस यांच्या आग्रहानंतर उपचार घेण्यास सहमती दर्शवली. त्यानंतर मनोज जरांगे यांना सलाईन लावण्यात आले. मनोज जरांगे 25 जानेवारी पासून उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून अद्याप सरकारचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेण्यासाठी आले नाही. दरम्यान, मंगळवारी संतोष देशमुख यांच्या आई आणि विनंतीनंतर मनोज जरांगेंनी पाणी प्राशन केले होते. भाजप आमदार सुरेश धस यांनी मंगळवारी रात्री आंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस केली होती. त्यांची तब्येत जास्तच खालावल्याने त्यांना उपचार घेण्याचा आग्रह केला होता. सुरेश धस यांच्या आग्रहानंतर मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास सुरुवात केली आहे. मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत त्यांना सहा सलाईन लावण्यात आल्या आहेत, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीकडे आरोग्य पथक लक्ष ठेवून आहे. नियमित त्यांच्या प्रकृतीची तपासणी वैद्यकीय पथकाकडून केली जात आहे. या वैद्यकीय पथकात जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप पाटील आहेत. दरम्यान, धनंजय देशमुख यांनीही मनोज जरांगे पाटील यांना उपचार घेण्याची विनंती केली आहे. दादांना एकच विनंती आहे त्यांनी सलाईन घ्यावी, असे धनंजय देशमुख म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शब्द दिला आहे, त्यांना उचित वाटते ते करावे, असेही ते म्हणाले. मनोज जरांगेंनी चौथ्या दिवशी घेतले पाणी
दरम्यान, मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या मातोश्री, मुलगी वैभवी देशमुख व बंधू धनंजय देशमुख यांनी उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी या सर्वांनी मनोज जरांगे यांना पाणी घेण्याची विनंती केली. सुरुवातीला त्यांनी नकार दिला. पण अखेर त्यांच्या विनंतीला मान देत त्यांनी संतोष देशमुख यांच्या आई व मुलीच्या हस्ते पाणी प्राशन केले. त्यांची प्रकृती पाहून देशमुख कुटुंबीयांनाही अश्रू अनावर झाले. सलगच्या उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती सातत्याने बिघडत चालली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावर तत्काळ तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे. जरांगेंच्या कोअर टीममधील 8 जणांना पोलिसांची नोटीस
मनोज जरांगे यांच्या कोअर टीममधील 8 जणांना गोंदी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांच्यासह उपोषणात बसलेल्या इतर उपोषणकर्त्यांच्या जुन्या आजारांचे वैद्यकीय रिपोर्ट उपलब्ध करून न दिल्याने ही नोटीस बजावण्यात आली आहे. उपोषणातील सर्व उपोषणकर्त्यांच्या नावाच्या सविस्तर यादीसह त्यांचे मोबाईल क्रमांक, उपोषणकर्त्यांचे पत्ते द्या, अशी मागणी पोलिसांनी या नोटीसीद्वारे केली आहे.

Share

-