मराठीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक:अमेय खोपकर Hotstarच्या कार्यालयात, क्रिकेट समालोचन मराठीत करण्याची मागणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच्या मराठीच्या मुद्यावरून आवाज उठवत असते. ओटीटी अॅपवरही मराठी भाषा देण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर क्रिकेटचे प्रक्षेपण होत असताना मराठी समालोचनाचा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. याचा जाब विचारण्यासाठी मनसे चित्रपट आघाडीचे प्रमुख अमेय खोपकर आज हॉटस्टारच्या कार्यालयात दाखल झाले. हॉटस्टारवर क्रिकेट सामन्यांचे प्रक्षेपण करताना समालोचनासाठी मराठीचा पर्याय देण्याची मागणी अमेय खोपकर यांनी केली आहे. मराठीमध्ये क्रिकेट समालोचनाचा पर्याय दिला जाईल, असे लेखी लिहून द्यावे, या मागणीसाठी खोपकर आग्रही आहेत. जोपर्यंत लेखी लिहून देत नाहीत, तोपर्यंत कार्यालयातून जाणार नसल्याची भूमिका अमेय खोपकर यांनी घेतली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा असूनही तुम्ही तिचा पर्याय का देत नाहीत? असा सवाल अमेय खोपकर यांनी विचारला आहे. हरियाणवी, भोजपुरीत समालोचन; पण मराठीत नाही
25 जानेवारी रोजी भारत आणि इंग्लंडमध्ये दुसरा टी-ट्वेंटी सामना झाला. या सामन्यात भारताने इंग्लंडला दोन गडी राखून पराभवाची धूळ चारली. या सामन्याचे प्रक्षेपण हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्म करण्यात आले होते. यावेळी हिंदी, इंग्लिश, तमिळ, तेलगूसह बंगाली, हरियाणी, कन्नड आणि भोजपुरी भाषेतून सामन्याचे समालोचन करण्यात आले. मात्र मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध नव्हता. अमेय खोपकरांनी दिला होता इशारा
‘हॉटस्टार’वर प्रसारित होणाऱ्या भारत-इंग्लंड टी-20 सामन्याचे समालोचन हरियाणी आणि भोजपुरी भाषेतूनही केले जात आहे, पण यात मराठी भाषा नाही. अभिजात भाषेचा दर्जा मिळूनही मराठीला ही अशी वागणूक देण्याची हिंमतच कशी होते? असा सवाल करत स्टार नेटवर्क यांना अभिजात म्हणजे काय त्याचा मनसे स्टाईल धडा द्यावाच लागेल, असा इशारा अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावरून दिला होता. त्यानंतर ते आज हॉटस्टारच्या कार्यालयात दाखल झाले.

Share

-