मराठवाड्यामध्ये तापमान 15 ते 20 अंश सेल्सिअस पर्यंत:पुढील दोन दिवसात कमाल तापमान वाढण्याची शक्यता; उकडा जाणवायला लागला
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यामध्ये पुढील पाच दिवस हवामान स्वच्छ आणि कोरडे राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील दोन दिवस कमाल तापमान एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. तर किमान तापमानात देखील तशीच वाढ नोंदवली जाऊ शकते. मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी तापमान हे 15 ते 20 अंश सेल्सिअस पर्यंत वाढले आहे. यामध्ये छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात 17.3, हिंगोली मध्ये 15.5 तर बीडमध्ये 17.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दक्षिणेकडील राज्यांना ईशान्य मान्सून सक्रिय झाल्याने पावसाचा तडाखा बसण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तर उत्तरेकडील राज्यांना देखील पश्चिम चक्रवात सक्रिय झाल्याने प्रचंड थंडी आणि तुरळक ठिकाणी पावसाने झोडपण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडील तसेच उत्तरेकडील तापमानात होणाऱ्या सततच्या चढउतारामुळे महाराष्ट्रात देखील काही प्रमाणात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र, बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहणार असून थंडीचा जोर देखील ओसरणार आहे. उत्तरेत पश्चिमी चक्रवात हा सक्रिय झाला आहे. तर दक्षिणेतील राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या सर्वांचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणात होत आहे. येथे 24 तासात महाराष्ट्रातील किमान तापमान दोन ते चार अंशांनी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान राज्यात अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा चटका बसणार असून चांगलाच उकाडा जाणवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उकडा आतापासूनच जाणवायला लागला मागील काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून थंडीचा जोर ओसरला आहे. राज्यात किमान तापमान वाढल्याने जानेवारी महिन्यातच उत्तर महाराष्ट्रासह खानदेशात उष्णता वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना उकडा आतापासूनच जाणवायला लागला आहे. पुढील काही दिवस राज्यातील उकाडा आणि तापमान वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.