मारहाण करणाऱ्या तिघांना 3 वर्ष कारावास:हिंगोली न्यायालयाचा निकाल, मारहाणीत तिघांना केले होते जखमी

हिंगोली तालुक्यातील पारडा येथे क्षुल्लक कारणावरून एकास मारहाण करून जखमी करणाऱ्या तिघांना तीन वर्ष साधी कैद व एकूण ३० हजार रुपये दंडाच्या शिक्षेचा निर्णय प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या न्यायधिश पी. आर. पमणानी यांनी गुरुवारी ता. ६ दिला आहे. याबबात विशेष सहाय्यक सरकारी वकील ॲड. अनिल इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील पारडा येथील संजय लगड यांच्या घराच्या पाठीमागील झाड गजानन घनघाव याने तोडले होते. याबाबत संजय यांनी जाब विचारला असता त्यांना ता. २ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी गजानन बळीराम घनघाव, शिवाजी बळीराम घनघाव (रा. खुडज, ता. सेनगाव), प्रियंका उर्फ कुंता सोनटक्के (रा. निळा, जि. नांदेड), धारुबाई कांबळे (रा. पारडा) यांनी घरात घुसून मारहाण केली. या मारहाणीत संजय जखमी झाले होते. या प्रकरणी संजय यांनी बासंबा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून वरील चौघांवर मारहाण करून जखमी करणे यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. पोलिस उपनिरीक्षक मगन पवार यांच्या पथकाने अधिक तपास करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होत. सदर प्रकरणात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने गजानन घनघाव, शिवाजी घनघाव, प्रियंका उर्फ कुंता सोनटक्के यांना प्रत्येकी तीन वर्ष साध्या कारावासाची शिक्षा व विविध कलमान्वये एकूण ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर धारूबाई यांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने विशेष सहाय्यक सरकारी वकील ॲड. अनिल इंगळे यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी जमादार सचिन गोरले यांनी सहकार्य केले.