वैद्यकीय उपकरण क्षेत्रातील स्टार्टअप्सना मिळणार चालना:मॅजिक आणि एएमटीझेड यांच्यात सामंजस्य करार

मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमांना बळकटी देत वैद्यकीय उपकरण उत्पादन क्षेत्रातील स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी मराठवाडा अ‍ॅक्सिलरेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्युबेशन कौन्सिल आणि आंध्र प्रदेश मेडटेक झोन लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार झाला. हा करार विशाखापट्टणम येथे आयोजित वर्ल्ड हेल्थ इनोव्हेशन फोरम (WHFI) 2024 दरम्यान करण्यात आला. सामंजस्य करारावर एएमटीझेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जितेंद्र कुमार शर्मा आणि मॅजिकचे संचालक आशिष गर्दे यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली. या कराराचा उद्देश वैद्यकीय उपकरणे आणि आरोग्य क्षेत्रातील नाविन्यपूर्णता, उद्योजकता आणि कौशल्य विकासाला चालना देणे हा आहे. तसेच मॅन्यूफॅक्चरिंग इंक्युबेटर स्थापन करण्याचा दृष्टीने महत्वाचे पाऊल आहे. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून दोन्ही संस्था एकत्र येऊन उपक्रम राबविण्यावर सहमति झाली, यात प्रामुख्याने मेक इन इंडिया मोहिमेला बळकटी देत वैद्यकीय उपकरणांच्या स्थानिक उत्पादनास प्रोत्साहन देणे., तसेच , आय सपोर्ट सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून वैद्यकीय उपकरण क्षेत्रातील स्टार्टअप्सना सहकारी करणे, हॅकॅथॉनचे आयोजन करून वैद्यकीय उपकरण नवकल्पनांना चालना देणे. छत्रपती संभाजीनगर येथे एएमटीझेडचे उपकेंद्र उभारून उत्पादन क्षेत्रातील स्टार्टअप्स आणि एमएसएमईंना सहाय्य करणे. यामध्ये मॅजिक स्थानिक उद्योग क्लस्टर – मराठवाडा ऑटो क्लस्टर आणि देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरसह तसेच शैक्षणिक संस्थांसोबत विविध उपक्रमांवर समन्वय साधणार असल्याची माहिती आशीष गर्दे यांनी दिली. एएमटीझेड बरोबरच्या या सहकार्यामुळे महाराष्ट्रातील टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्ये वैद्यकीय उपकरण क्षेत्रातील स्टार्टअप्सना चालना मिळेल, असे ते म्हणाले. एएमटीझेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जितेंद्र कुमार शर्मा म्हणाले, “हे सहकार्य हेल्थकेअर क्षेत्रातील नाविन्यपूर्ण आणि शाश्वत उपाय शोधण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. एएमटीझेडच्या कौशल्याचा आणि मॅजिकच्या स्थानिक इकोसिस्टीमच्या ज्ञानाचा लाभ घेत, हे करार भारतातील स्टार्टअप्ससाठी नवे दालन उघडेल.” एएमटीझेड बद्दल आंध्र प्रदेश मेडटेक झोन (एएमटीझेड) हा भारतातील अग्रगण्य वैद्यकीय तंत्रज्ञान पार्क असून, येथे कॉमन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आणि कॉमन सायंटिफिक फॅसिलिटी उपलब्ध आहेत. या सुविधांमध्ये विशेष लॅबोरेटरी, वेअरहाउसिंग, आणि टेस्टिंग सेंटर्सचा समावेश आहे, ज्यामध्ये सेंटर फॉर इलेक्ट्रोमॅग्नेटिक कंपॅटिबिलिटी अँड सेफ्टी टेस्टिंग, सेंटर फॉर बायोमटेरियल टेस्टिंग, 3-डी प्रिंटिंग सेंटर, लेसर, एमआरआय सुपरकंडक्टिंग मॅग्नेट्स सेंटर्स, गॅमा इरॅडिएशन सेंटर, मोल्ड अँड मशीनिंग सेंटर यांसारख्या औद्योगिक सेवांची सुविधा पुरवली जाते. जगातील सर्वात मोठ्या वैद्यकीय तंत्रज्ञान उत्पादन क्लस्टरपैकी एक असलेल्या या झोनमध्ये 200 हून अधिक कंपन्या कार्यरत आहेत.

Share

-