मनसे पदाधिकाऱ्याची अजित पवारांच्या नेत्याकडून हत्या?:जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट, मंत्रिमंडळातील मंत्री जबाबदार असल्याचा केला आरोप
![](https://natepute.com/wp-content/uploads/2025/01/new-project-2025-01-25t180332485_1737808680-1vLNRa.jpeg)
ठाण्यातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांची सुमारे 4 वर्षांपूर्वी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जमील शेख यांच्या हत्येला वाचा फोडत अनेक दावे केले. जमील शेख यांच्या हत्येचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यावर लावण्यात आला होता. या गुन्हेगाराला वाचवणारा आका सरकारमधील मंत्रिमंडळात असल्याचा गौप्यस्फोट आव्हाड यांनी केला आहे. तसेच मंत्रिमंडळात बसलेले सर्व मंत्री या हत्येला जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला. मनसे पदाधिकारी जमील शेख यांची नोव्हेंबर 2020 मध्ये हत्या झाली होती. ते राबवडीतील बिस्मिल्ला हॉटेल समोरून मोटरसायकलवरून जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि त्यानंतर ते फरार झाले. या हल्ल्यात जमील शेख यांच्या त्यांच्या डोक्यात गोळी लागली. त्यांना जखमी अवस्थेत एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी मुख्य आरोपी ओसामा शेख याला ठाणे पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने अटक केली होती. मात्र, चार वर्षांनी जितेंद्र आव्हाड यांनी हे प्रकरण उकरून काढले आहे. काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
मंत्रिमंडळात बसलेले सर्व मंत्री या हत्येला जबाबदार आहेत. एक नाही अनेक आकांचे आका मंत्रिमंडळात बसले आहेत, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्या आरोपीला पकडायला जाणाऱ्या पोलिसाचीच बदली केली होती आणि त्या गुन्हेगाराची एवढी हिंमत की त्या बदलीचे स्टेटस व्हॉट्सअॅपवर ठेवले होते, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. नजीब मुल्ला असे आरोपीचे नाव
जितेंद्र आव्हाड यांना जमील शेख हत्या प्रकरणातील गुन्हेगाराचे नाव विचारले असता, या गुन्हेगाराचे नाव कुटुंबाने घेतले आहे. एफआयआरमध्येही ते नाव आहे. पोलिसांनी कितीही लपवले तरीही एफआयआर रद्द करता येत नाही. एफआयआरमध्ये नाव असताना त्याचे चार्जशीटमध्ये नाव नाही. चार्जशीटमध्ये त्याचा दोषी किंवा निर्दोष असा पोलिसांनी उल्लेखही केलेला नाही, याचा अर्थ काय घ्यायचा? असा सवाल करत त्याने 2014 मध्येही असाच गुन्हा केला होता. तरीही पोलिसांनी काही कारवाई केली नाही. त्याचे नाव नजीब मुल्ला आहे, असे आव्हाड यांनी सांगितले. पोलिसांकडे एक्स्ट्रा पेन ड्राईव्ह
नजीब मुल्ला पूर्वी आमच्याबरोबर होता. त्याचे नाव एफआयआरमध्ये आहे. ओसामा नावाचा जो गुन्हेगार आहे, ज्याने ही सुपारी घेतली. त्याने तीन पेनड्राईव्ह पोलिसांना दिले होते. पण पोलिसांकडे तीनचे चार पेनड्राईव्ह झाले. म्हणजे पेनड्राईव्हसुद्धा मॅनेज करून पाठवला, असा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाड यांनी केला. चौकशी करणाऱ्या पोलिसाची 8 तासांत बदली
या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या इन्स्पेक्टरचे नाव नितीन ठाकरे. पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी लखनौ, गोरखपूरपर्यंत केली होती. पहिला आरोपी पकडला त्याने कुणाच्या सांगण्यावरून गोळी झाडली, त्याचे नाव सांगितले. मात्र त्याच नितीन ठाकरेंची बदली 8 तासांत केली. हिंमत असेल तर त्यांच्या हातात तपास द्या, असे आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी केले. नितीन ठाकरेची बदली झाल्यावर नजीब मुल्लाने स्टेटस ठेवले होते. एवढी हिंमत कुठून होते, ही मानसिकता, विकृती आहे. जमील शेखला त्यानेच 2014 ला मारले होते, असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला. एफआयआर मध्ये नाव असेल तर…
सगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर मी हा विषय काढतो. त्या कुटुंबाने अनेकदा माझी भेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु मी भेट नाकारली. कारण आपण राजकारण करतोय असा आरोप व्हायला नको. मी राजकारण करत नाही. मी त्या कुटुंबाच्या बाजूने बोलतोय. मला राजकारण करायचं असते तर निवडणुकीत वापर केला असता. एफआयआर मध्ये नाव असेल तर पोलिसांना चार्जशीटमध्ये तो आरोपी आहे की नाही? हे सांगावेच लागते, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.