मोगल बादशहा औरंगजेबाच्या कौतुकाचे प्रकरण:बेजबाबदार बोलू नका, बेताल वक्तव्ये करू नका; आ. अबू आझमींना न्यायालयाची ताकीद

मोगल बादशहा औरंगजेबाविषयी वक्तव्याप्रकरणी समाजवादी पार्टीचे मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांना अटकेपासून संरक्षण देताना सत्र न्यायालयाने कानउघाडणी केली आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ राजकारण्याचे कोणतेही बेजबाबदार विधान दंगली भडकवू शकते. त्यामुळे आझमींनी प्रसिद्धिमाध्यमांना मुलाखती देताना संयम आणि सावधगिरी बाळगावी, अशी ताकीद न्यायालयाने त्यांना दिली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांनी आझमी यांना मंगळवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. न्यायालयाच्या तपशीलवार आदेशाची प्रत गुरुवारी उपलब्ध झाली. त्यात न्यायालयाने आझमी यांची कानउघाडणी करताना त्यांना संयमाने वागण्याची ताकीद दिली. आझमी यांनी प्रसिद्धिमाध्यमांना मुलाखत देताना केलेल्या काही विधानांशी संबंधित हा गुन्हा आहे आणि त्यासाठी पोलिस कोठडीची आवश्यकता नाही. तसेच आझमी हे एक राजकारणी आणि व्यापारी आहेत व पळून जाणे अशक्य आहे हे लक्षात घेऊन त्यांना अटकेपासून संरक्षण दिले जात आहे. तथापि, सध्याच्या परिस्थितीचा विचार करता कोणतेही बेजबाबदार विधान दंगली भडकावू शकते आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करू शकते. त्यामुळे आझमी यांनी प्रसिद्धिमाध्यमांना मुलाखती देताना स्वतःवर संयम बाळगण्याची ताकीद आपण त्यांना देऊ इच्छितो, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. परंतु, तपास अधिकाऱ्याकडे कथित मुलाखतीची चित्रफीत नव्हती आणि ती न पाहताच गुन्हा नोंदवणे हे आश्चर्यकारक असल्याचा ताशेरा न्यायालयाने ओढला आहे. रंग टाकला तर मुस्लिमांनी संयम बाळगावा : आझमी दरम्यान, आझमी यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट टाकली आहे. त्यात म्हटले आहे की, रमजानला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे हिंदू बांधवांना विनंती आहे की त्यांनी जाणीवपूर्वक कोणावरही रंग टाकू नये. मुस्लिमांना विनंती आहे की, तुमच्यावर कोणी रंग टाकला तरीही संयम बाळगा. कोणताही वाद घालू नका. मशिदीत जाऊन नमाज अदा करा आणि थेट घरी जा. या देशात सलोखा टिकून राहू देत. कोणतेही वादविवाद होऊ नयेत.

Share

-