सोमवारपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात:महाविकास आघाडीचा सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार, पत्रकार परिषद घेत साधला निशाणा

राज्याचा अर्थसंकल्प उद्यापासून सुरू होणार आहे. तसेच अधिवेशनापूर्वी सत्ताधाऱ्यांकडून चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमावर विरिधकांनी बहिष्कार टाकण्यात आला आहे. महाविकास आघाडीची आज पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेत चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड, ठाकरे गटाचे अंबादास दानवे आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे. काही जिल्ह्यांमध्ये दारूबंदी आहे, गडचिरोली जिल्ह्यात, वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असताना देखील दारूबंदीबाबत सात हजार गुन्हे दाखल झाले आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. मालाडमध्ये, बदलापूरमध्ये, अमरावतीमध्ये घटना घडल्या. या सगळ्या घटनांवर सरकार गंभीर नसल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यामधील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही पकडला जात नाही, ही घटना नऊ डिसेंबरला झाली आहे. आज दोन मार्च उगवलेला आहे. तीन महिने झाले असतानाही हा आरोपी पकडला जात नाही. या गावाचे दुर्दैव असे की या गावातील लोकांना उपोषणाचा निर्णय घ्यावा लागतो. हे सर्व घडत असताना कोरटकर नावाची मस्ती आलेली व्यक्ती ही कोणाशी संबंधित आहे? असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. अंबादास दानवे म्हणाले, इंद्रजित सावंत यांच्यासारख्या इतिहास संशोधकाला धमकी देते. आणि दुसरीकडे प्रशांत कोरटकरांना सरकार संरक्षण देते. म्हणजे हे सरकार कोणत्या दिशेने चालले आहे, आतापर्यंत त्यांना अटक करायला पाहिजे होती. कृषी विभागात मोठा घोटाळा झाला आहे, आरोग्य विभागाचे जे टेंडर निघाले होते त्याला स्थगिती देण्यात आली आहे. एसटीचे जे तेराशे दहा बसेसचे टेंडर निघाले होते, त्यालाही स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार व युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील महायुती सरकारवर टीका केली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, आज ते सत्तेत आहेत उद्या आम्ही सत्तेत येऊ. आम्हाला पद नव्हे तर राज्याचे हित महत्त्वाचे आहे, असे यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.