मुंबईत अमित शहांची होणार पत्रकार परिषद:महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीनंतर भाजपचाही येणार जाहीरनामा!

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरू झाल्यापासून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार असून, 23 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आपापले जाहीरनामे प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचा जाहीरनामा उद्या दिनांक 10 नोव्हेंबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबई येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पत्रकार परिषद होणार असून यात जाहीरनामा जाहीर केला जाऊ शकतो. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला जोर आला असून, महायुतीच्या उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा पाठिंबा मिळत आहे. पंतप्रधान मोदी यांची नाशिक आणि धुळ्यात सभा पार पडली, तर अमित शाह यांनी सातारा, कोल्हापूर, आणि सांगली येथे प्रचारसभा घेतल्या. दुसरीकडे, महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे प्रचारात सहभागी झाले आहेत. महाविकास आघाडीकडून निवडणुकीसाठी पंचसूत्री कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, महाविकास आघाडीकडून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पंचसूत्री जाहीर करण्यात आली आहे. यात महिलांना महिन्याला 3 हजार रुपये देणार, तसेच महिलांना एसटीचा प्रवास मोफत असणार आहे, तसेच बेरोजगार तरुणांना महिन्याला 4 हजार रुपये मिळणार, शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी केली जाणार, 25 लाखांपर्यंत आरोग्य विमा आणि औषधे मोफत मिळणार तसेच जातनिहाय जनगणना आणि आरक्षणाची मर्यादा वाढवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या जाहिरनाम्यानंतर आता भाजप त्यांच्याकडून लोकांना कोणत्या गोष्टींचे आश्वासन देणार याकडे लक्ष असणार आहे. विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने राजकीय पक्षांकडून मतांसाठी तसेच उमेदवार विजयी करून देण्यासाठी लोकांसमोर जाहीरनामे जाहीर करण्यात येत आहेत.

Share

-