मुंबईत मराठी पोलिसही असुरक्षित?:कल्याणमध्ये पुन्हा एकदा मराठी कुटुंबावर हल्ला, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई येथील कल्याणमध्ये पुन्हा एकदा मराठी कुटुंबावर परप्रांतीयांकडून बेदम मारहाण झाल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. उत्तम पांडे व त्याच्या पत्नीने ही मारहाण केली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झाली आहे. उत्तम पांडे आणि त्याच्या पत्नीच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ज्याला मारहाण करण्यात आली आहे तो तरुण पोलिस कर्मचारी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षांच्या मुलीचा विनयभंग करण्यात आला होता. या घटनेचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या कुटुंबाला पांडे आणि त्याच्या पत्नीने बेदम मारहाण केली आहे. या घटनेनंतर आरोपी कुटुंबाच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर मुंबईमध्ये मराठी पोलिस देखील सुरक्षित नाहीत का? असा सवाल उपस्थित झाला आहे. काही दिवसांपूर्वीच कल्याणमध्येच एका हायप्रोफाइल सोसायटीमध्ये एका मराठी कुटुंबाला गुंडांना बोलावून एका परप्रांतीय व्यक्तीने मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेचे पडसाद विधानसभेतही पाहायला मिळाले होते. अविनाश शुक्ला नावाच्या व्यक्तीने केलेल्या मारहाण प्रकरणी त्याच्यावर निलंबनाच्या कारवाईची घोषणा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तसेच त्यानंतर अविनाश शुक्ला पोलिसांच्या समोर शरण देखील गेले होते. मराठी माणसांवर होणाऱ्या हल्ल्यांवरून मुंबईत तसेच महाराष्ट्रात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गेल्या काही आठवड्यांपूर्वी देखील एका मारवाडी दुकानदाराने अरेरावी करत एका मराठी महिलेला मारवाडीमध्ये बोलण्यास सांगितले होते. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दुकानदाराला त्यांच्या स्टाइलमध्ये समज दिली होती. त्यानंतर या मुजोर दुकानदाराने माफी देखील मागितली होती.

Share

-