मुंबई महानगरपालिकेच्या परीक्षेत मोठा घोटाळा?:गट ‘अ’चा पेपर फुटल्याचा आरोप, एक-एक प्रश्न 10 लाखांना विकला गेल्याचा दावा

बीएमसीच्या परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या परीक्षेचा पेपर फुटला असून एक-एक प्रश्न 10 लाखांना विकला गेल्याचा दावा करण्यात आला आहे. या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. चौकशी होईपर्यंत या परीक्षेचा लावू नये अशीही मागणी करण्यात आली आहे. आता हे प्रकरण राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचले आहे. राज ठाकरे लवकरच या संबंधित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याधी बोलणार असल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिकेच्या गट अ खात्यात नियुक्तीसाठी 25 फेब्रुवारी रोजी परीक्षा पार पडली. ही परीक्षा आयबीपीएसमार्फत घेण्यात आली होती. परंतु, 19 फेब्रुवारी रोजी या परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप करण्यात येत आहे. परीक्षेत कोणते प्रश्न येणार यासंदर्भातील माहिती पुरवल्याचा आरोप 500 हून अधिक अभियंत्यांनी केला आहे. काय म्हणाले संदीप देशपांडे?
महानगरपालिकेच्या गट अ च्या ज्या परीक्षा होत्या, त्यात साधारणपणे 1200 लोकं बसली होती. जो पेपर 25 तारखेला होणार होता. तो पेपर आधीच 19 तारखेला फुटला. आमच्या माहितीप्रमाणे या प्रश्नपत्रिकेतील एक एक प्रश्न दहा दहा लाखाला विकला गेला. शेकडो कोटींचा घोटाळा या परीक्षेच्या माध्यमातून झाला. घोटाळेबाज असे इंजिनियर तुम्ही पालिकेला देणार आहात का? असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. राज ठाकरे लवकरच मुख्यमंत्र्यांशी बोलणार
एकदा हे पैसे देऊन इंजिनियर झाले, की नंतर हे पैसे खाण्याचेच काम करतील. यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. राज ठाकरे यांना आम्ही पूर्ण प्रकाराची कल्पना दिलेली आहे. लवकरच राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची भेट घेऊन त्या विषयावरती बोलणार आहेत, अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली. …तर आमच्या पद्धतीने कारवाई करू
या घटनेत परीक्षा रद्द झाली पाहिजे आणि चौकशी झाली पाहिजे. जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची ठाम भूमिका असल्याचे संदीप देशपांडे म्हणाले. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटून रितसर तक्रार देणार आहेत. देवेंद्र फडणीस यांच्याकडे आम्ही कारवाईसाठी जाऊ. त्यांनी कारवाई नाही केली तर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू, असा इशाराही संदीप देशपांडे यांनी दिला. हा विषय राज ठाकरेंकडे गेला, तर न्याय मिळेल
माझ्याकडे हे प्रकरण आले, तेव्हा तक्रार केली. त्यादिवशी एक मोठा गट आम्हाला येऊन भेटला. हा विषय राज ठाकरे यांच्याकडे पोहोचावा, अशी त्यांची अपेक्षा होती. हा विषय त्यांच्याकडे गेला तर त्यांना न्याय मिळेल. काही लोकांनी प्रामाणिकपणे परीक्षा दिलेली आहे. त्यांना न्याय मिळावा म्हणून राज ठाकरे यांच्याकडे आम्ही आलेलो आहोत. संदीप देशपांडे आणि मी साहेबांकडे आमचे मत मांडले. ते सीएम साहेबांशी बोलणार आहेत, असे मनीष धुरी म्हणालेत.

Share

-