पक्षातील गद्दारांमुळेच माझा पराभव:आता गद्दारांना पक्षात थारा मिळणार‎ नाही- बोदकूरवार

आपण प्रत्येकच कार्यकर्त्याला मदत करत आलो. आपला कार्यकर्ता वाढला पाहिजे, हीच माझी भूमिका राहिली. परंतु, पक्षातील नगराध्यक्ष स्तरावरील जबाबदार पदाधिकाऱ्यांच्या गद्दारीमुळे माझा अनपेक्षितपणे पराभव झाला, असे खळबळजनक वक्तव्य माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार केले आहे. त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आपल्या प्रतिक्रिया देताना त्यांनी हा आरोप केला. या वेळी ते चांगलेच भाऊक झाले. विचार व्यक्त करतांना त्यांच्या डोळ्यांतून सारखे अश्रू वाहत होते. पक्षात आता गद्दारांना थारा मिळणार नाही, असा गर्भित इशारा देखील त्यांनी दिला. बैठकीत बोदकूरवार पुढे म्हणाले की, मी १९९३ पासून राजकारणात आलो. त्यावेळी मी भाजपचा तालुका अध्यक्ष म्हणून कामाला सुरवात केली. त्यानंतर अनेक वर्षे मी पक्षाची निष्ठेने सेवा केली. अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी यांना निवडणुकीत मदत केली. इतकी वर्षे पक्षाची निस्वार्थ सेवा केल्यानंतर युती तुटल्यामुळे मला पक्षाकडून संधी मिळाली. या संधीचे मी सोने केले. २०१४ मध्ये कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मला साथ दिल्याने मी आमदार म्हणून निवडून आलो. त्यानंतर मी निरंतर पक्ष, कार्यकर्त्यांना जोडण्यावर भर दिला. पक्ष बांधणी व पक्ष संघटन मजबूत केले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वेळोवेळी साथ दिली. या काळात मला माझ्या कुटुंबालाही वेळ देता आला नही. १० वर्षाच्या कार्यकाळात मी वणीत विकास घडवून आणला. त्याचचं फलित म्हणून मला याही निवडणुकीत जनतेने भरभरून प्रतिसाद दिला. मात्र, काही गद्दारांच्या अंतर्गत खेळीने मला अनपेक्षितपणे पराभवाचा सामना करावा लागला. पक्षातील या गद्दारांना बाहेरचा रस्ता दाखवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. माझ्या विरोधात छुपा अजेंडा वापरला पक्षातील विश्वासघातकी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माझ्या विरोधात छुपा अजेंडा वापरला. त्यांनी विरोधात प्रचार केला. पक्षात एका मोठ्या पदावर असलेल्या त्या पदाधिकाऱ्याने धोकाधडी केली. त्याला पक्षातीलच काही लोकांनी साथ दिली. त्यामुळे आपला अनपेक्षित पराभव झाला असल्याचे बोदकुरवार यांनी या बैठकीत जाहीरपणे सांगितले.

Share

-