राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटात नाराजी?:आम्ही कमी पडत असल्याचे काही नेत्यांना वाटत असेल, रोहित पवारांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. छावा सिनेमाच्या बाबतीत त्यांनी केलेल ट्विटवर देखील राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. जवळच्या माणसांकडून सावध राहण्याची गरज असते, त्याचा धडा यातून मिळाला, असे ट्विट त्यांनी केले होते. आज अधिवेशनात देखील पत्रकारांशी बोलताना त्यांनी दिलेले उत्तर पेचात टाकणारे आहेत. पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, गेली 7 वर्षे पक्षासाठी लढल्यानंतर कुठेतरी आम्ही कमी पडत असल्याचे काही नेत्यांना वाटत असल्याने कदाचित त्यांनी निर्णय घेतला असेल. एक आमदार म्हणून पक्षाचा पाठिंबा असला काय किंवा नसला काय सामान्य लोकांच्या हितासाठी आजपर्यंत मी लढत आलो आहे. पक्षाचा पाठिंबा कायम राहिला असून विशेषत: शरद पवारांचा पाठिंबा माझ्यासारख्याला आणि इतरही कार्यकर्त्याला राहिलेला आहे. तेवढाच पाठिंबा माझ्यासाठी खूप काही आहे. महाराष्ट्र नाराज आहे त्यात मीही नाराज आहे पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, मी व्यक्तिगत टिप्पणी करणार नाही, परंतु मीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र या सरकारवर नाराज आहे. वरोधी पक्षावरही जनता नाराज आहे. सरकार लोकांचे प्रश्न सोडवत नाही म्हणून नाराज आहे आणि विरोधी पक्ष लोकांचा आवाज बनून सरकारविरोधात लढत नाही म्हणून जनता नाराज आहे. रोहित पवार विरोधी पक्षातील नेत्यांना उद्देशून बोलताना म्हणाले, मी विरोधी पक्षातील सर्व नेत्यांना विनंती करतो, अनेक अनुभवी नेते, मंत्री राहिलेले नेते आमच्याकडे आहेत. परंतु आज लोकांच्या बाजूने बोलताना खूप कमी नेते दिसतात. आज लढण्याचे दिवस आहेत, शांत बसण्याचे नाहीत. महाराष्ट्र नाराज आहे त्यात मीही नाराज आहे असे बोलायला हरकत नाही. जबाबदारी दिली नाही म्हणून नाराज आहे असा विषय नाही दरम्यान, शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला रोहित पवार उपस्थित नसल्याचे दिसून आले. यावर प्रश्न विचारला असता रोहित पवार यांनी मी आजारी असल्याने या बैठकीला जाता आले नाही तसेच त्या बैठकीत काय चर्चा झाली ते सांगता येणार नाही, असे उत्तर पवारांनी दिले. पुढे रोहित पवार म्हणाले, अजूनपर्यंत माझ्याकडे कुठली जबाबदारी आळिल नाही किंवा जबाबदारी दिल्याचे कळाले नाही. जबाबदारी दिली नाही म्हणून नाराज आहे असा विषय नाही. खऱ्या अर्थाने लढण्याचे दिवस आले आहेत. लढले पाहिजे, असेही रोहित पवार म्हणाले.