नैसर्गिक रंग संस्कृती जपण्यासह देतात पर्यावरण संवर्धनाचा संदेश:भारतीय कॉलेजमध्ये प्रा. डॉ. दत्तात्रय रत्नपारखी यांचे प्रतिपादन

बाजारात मिळणारे रासायनिक रंग हे त्वचेवर दुष्परिणाम करतात. डोळ्यांची जळजळ वाढवतात आणि पर्यावरणाला हानी पोहोचवतात. त्याउलट नैसर्गिक रंग वनस्पतींपासून बनवले जात असल्याने ते शरीरासाठी सुरक्षित असतात. शिवाय, रासायनिक रंगांमुळे पर्यावरण, प्राणी आणि जलस्रोत प्रदूषित होतात. तर, नैसर्गिक रंग त्यांच्या संवर्धनात मदत करतात, असे प्रतिपादन नरसम्म्मा महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. दत्तात्रय रत्नपारखी यांनी केले. भारतीय महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने होळीच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक रंग बनवण्याची कार्यशाळा नुकतीच आयोजित केली होती. त्या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राणिशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. दीपलक्ष्मी कुळकर्णी होत्या. प्रा. डॉ. रत्नपारखी यांनी नैसर्गिक रंगांचे महत्त्व सांगून रासायनिक रंगांच्या धोक्यांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली. तसेच या होळीसाठी विद्यार्थ्यांसह उपस्थितांनी नैसर्गिक रंगांचा वापर करावा, असे आवाहनही केले. डॉ. दीपलक्ष्मी कुळकर्णी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाल्या, कोणताही सण हा उत्साहाने आणि आनंदाने साजरा करावा. परंतु, त्याचबरोबर सण साजरा करताना पर्यावरणाचे आणि आरोग्याचे भान ठेवणेही महत्त्वाचे आहे. नैसर्गिक रंग वापरल्याने होळी खेळताना त्वचा व आरोग्य सुरक्षित राहते, असेही त्या म्हणाल्या. कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी स्वतः नैसर्गिक रंग तयार करून त्यांचा वापर करण्याचा संकल्प केला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवेदनशीलता वाढली आणि नैसर्गिक संसाधनांचा शास्त्रीय वापर कसा करावा, याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. अनेक विद्यार्थ्यांनी पुढील वर्षी हा उपक्रम पुन्हा आयोजित करण्याची मागणी केली. हा उपक्रम केवळ पर्यावरणपूरक सण साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता व्यावसायिक संधीची जाणीव करून देणारा ठरला, असे मत राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. सुमेध वरघट यांनी केले. या प्रसंगी संगणकशास्त्र विभागाच्या डॉ. भार्गवी चिंचमलातपुरे व डॉ. मीना डोईबाले उपस्थित होत्या. कार्यशाळेचे सूत्रसंचालन कार्यशाळा समन्वयक प्रा. एल. व्ही. पवार यांनी केले. मान्यवरांचा परिचय प्रा. विशाल वरघट यांनी उपस्थितांना करून दिला. कार्यशाळेच्या शेवटी डॉ. पंकजा चेडे यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे आणि उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थ्यांनी गिरवले नैसर्गिक रंग तयार करण्याचे धडे : डॉ. स्वाती ठाकूर व एल. व्ही. पवार यांनी विद्यार्थ्यांना गुलाब, झेंडू, बीट, पालक, हळद, पळस, गोकर्ण, जास्वंद यासारख्या फुले तसेच त्यांच्या पानापासून आणि भाज्यांपासून नैसर्गिक रंग कसे तयार करतात, याचे प्रात्यक्षिकासह धडे दिले. त्यांना डॉ. पल्लवी सिंग यांनी सहकार्य केले. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष रंग तयार करण्याच्या प्रक्रिया शिकल्या आणि अनुभवल्या. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी मान्यवरांच्या मार्गदर्शनात फुले व भाज्यांपासून नैसर्गिक रंग तयार केलेत. त्यामध्ये हिरवा रंग हा पालक व कोथिंबीर पेस्ट करून, पिवळा रंग हा हळद व पळसाच्या मिश्रणातून, लाल रंग हा जास्वंदाच्या फुलापासून, गुलाबी रंग बीटच्या रसाचा वापर करून, तर निळा रंग गोकर्णाच्या फुलांच्या रसापासून तयार केलेत. कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी या रंगांचा स्पर्श अनुभवला आणि बाजारातील कृत्रिम रंगापेक्षा हे रंग किती मऊ आणि सुगंधी आहेत, याची प्रचिती घेतली. असे तयार केलेत विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंग

Share

-