भाजपमध्ये हिंमत असेल तर माझा पराभव करुन दाखवावा:देवेंद्रजी असो की कुणी बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचणार- नवाब मलिक

कोणी कितीही मोठे असू द्या किंवा कितीही छोटे पण माझी माफी मागितली नाही तर मी त्यांच्याविरोधात कोर्टात जाणार आहे. देवेंद्रजीही पण असतील तरी ही केस करणार आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दिला आहे. नवाब मलिक पुढे बोलताना म्हणाले की, नवाब मलिक मागणारा नाही देणारा आहे. आम्ही देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा मागतोय का? आम्ही पाठिंबा मागत नाही आणि मागणारही नाही असे त्यांनी म्हटले आहे. हिंमत असेल तर पराभव करुन दाखवावा नवाब मलिक म्हणाले की, मी फटिचर माणूस आहे. कोणीही माझ्या नादी लागू नका. भाजपचे लोकं त्यांचे प्रचारक म्हणून काम करत आहे. आम्ही त्यांना पाठिंबा मागितलेला नाही. त्यांना माझे आव्हान आहे की तुम्ही माझ्याविरोधात ताकद लावूण बघा, तुमच्यात हिंमत असेल तर माझा पराभव करुन दाखवा. .. तर 20-30 हजार मते वाढतील नवाब मलिक म्हणाले की, मी बोलायला सुरुवात केल्याने कोर्टात जाऊन माझा जामीन रद्द करण्याचा हे प्रयत्न करत आहेत. पण मी पुन्हा जेलमध्ये गेलो तर माझे 20-30 हजार मते वाढतील. जे लोकं मला आंतकवादी, दहशतवादी म्हणत असतील त्यांच्यावर माहिती घेत क्रिमिनल केस करणार असे त्यांनी म्हटले आहे. 23 तारखेपर्यंत थांबा नवाब मलिक म्हणाले की,​​​​​​​ निकालानंतर काय होईल हे मी आजच कसे सांगू, पण 23 तारखेला निकालानंतर अजित पवार किंग मेकर ठरतील. निकालानंतर आमचा पक्ष किंवा अजित पवार यांची भूमिका चंद्राबाबू नायडूंसारखी असू शकते. 23 पर्यंत थांबा. पवार कुटुंब एकत्र होणारच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी छगन भुजबळ आणि अजित पवारांच्या विधानावार भाष्य केले आहे. छगन भुजबळ आणि त्यांच्यासोबतच्या सहकाऱ्यांनी शिवसेना का सोडली याचे कारण नवाब मलिक यांनी सांगितले आहे. भुजबळ यांनी मंडळ आयोगाच्या मुद्द्यावरून शिवसेना सोडली, असे मलिक यांनी सांगितले. तसेच पवार कुटुंब हे उद्या एक होणारच आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपच्या नाऱ्यालाही केला विरोध ‘बटेंगे ते कटेंगे’ ही घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात दिली आहे. त्यांच्या या नाऱ्याला देखील नवाब मलिक यांनी विरोध केल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मानखुर्द शिवाजी नगर येथील उमेदवार नवाब मलिक यांनी देखील अजित पवारांप्रमाणे बाजू मांडली. नवाब मलिक म्हणाले की, “बटेंगे तो कटेंगे’ सारखी विधाने चुकीची, घृणास्पद आहेत. यातून कोणताही फायदा होऊ शकत नाही. अशा प्रकारच्या राजकारणामुळे उत्तर प्रदेशचे खूप नुकसान झाले आहे. अगदी मंदिराच्या उभारणी नंतरही उत्तर प्रदेशात भाजपचा दारुण पराभव झाला. त्यामुळे अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गराजांवर राजकारण केले पाहिजे. लोकांच्या विकासाची चर्चा व्हायला हवी. हिंदू-मुस्लिमच्या नावावर कोणीही देशाचे विभाजन करू नये, असे स्पष्ट मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले होते.

Share

-