नीलम मी आलोय!:वडिलांचे शब्द कानावर पडले अन् मृत्यूशी झुंजणाऱ्या लेकीने दिला प्रतिसाद, अमेरिकेतले डॉक्टरही गहिवरले

उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेलेल्या कराड तालुक्यातील उंब्रज गावच्या नीलम तानाजी शिंदे या तरूणीचा भीषण अपघात झाल्याने ती कोमात गेलीय. इमर्जन्सी व्हिसा मिळताच लेकीला भेटण्यासाठी वडिलांनी अमेरिका गाठली. सोमवारी (३ मार्च) स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री दीड वाजता तानाजी शिंदे हे सॅक्रामेंटोमध्ये दाखल होताच त्यांनी थेट हॉस्पिटल गाठलं. नीलम मी आलोय, हे वडिलांचे शब्द कानावर पडताच लेकीच्या डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल झाली आणि बाप माणसाला रडू कोसळलं. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅक्रामेंटो शहरात १८ दिवसांपूर्वी कार अपघात नीलम शिंदे ही तरूणी गंभीररित्या जखमी झाली आहे. तिच्यावर युसी डेव्हिस मेडिकल सेंटरमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सोमवारी मध्यरात्री कॅलिफोर्नियात पोहोचताच वडील तानाजी शिंदे यांनी सॅक्रामेंटोतील हॉस्पिटल गाठलं. वैद्यकीय सुत्रांनी त्यांना सकाळी यायला सांगितलं. मात्र, आत्ताच मुलीला भेटण्याचा त्यांनी हट्ट केला. वडिलांच्या हट्टापुढं हॉस्पिटल प्रशासनाचं काही चाललं नाही. स्टाफनं त्यांना अतिदक्षता विभागात नेऊन मुलीला भेटवलं. नीलम मी आलोय, हे वडिलांचे शब्द कानावर पडताच नीलमच्या डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल झाली. हा प्रतिसाद पाहून तानाजी शिंदे यांना रडू कोसळलं. हॉस्पिटल स्टाफ देखील गहिवरला. बाप लेकीच्या नात्याची ताकद यावेळी सर्वांनी पाहिली. अमेरिकेत पोहचताच वडिलांनी आपल्या मुलीला डोळे भरून पाहिलं. मुलीने देखील प्रतिसाद दिल्यानं वडिलांना मोठा धीर आला. नीलमचे वडील तानाजी शिंदे आणि मामे भाऊ गौरव कदम हे इर्मजन्सी व्हिसावर अमेरिकेला गेले आहेत. दहा वर्षे व्हिसाची मुदत असते. परंतु, सहा महिन्याच्या आत त्यांना परत यावे लागते. नंतर पुन्हा ते अमेरिकेला जाऊ शकतात. या नियमानुसार नीलमचे वडील आणि मामे भावाला सलग सहा महिने अमेरिकेत राहता येईल. सुरूवातीचे दहा दिवस त्यांच्या राहण्याची सोय हॉस्पिटल प्रशासनाकडून करण्यात आली आहे. त्यानंतरची सोय अमेरिकास्थित महाराष्ट्रीयन लोकांच्या संस्थांकडून केली जाणार आहे. काही उद्योगपती देखील सहकार्यासाठी पुढं आले आहेत.

Share

-