संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यूज व्हॅल्यू साठी चर्चा:प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्या : धनंजय मुंडे
संतोष देशमुख हत्या प्रकरणात केवळ न्यूज व्हॅल्यू साठी चर्चा केली जात असल्याचा आरोप मंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे. या संदर्भात आपण काहीही बोलणार नसल्याचे त्यांनी माध्यमंशी बोलताना सांगितले. मात्र या प्रकरणातील सर्व सुनावणी ही फास्टट्रॅक कोर्टात चालवावी आणि संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी माझी मागणी असल्याचे देखील मुंडे यांनी म्हटले आहे. मुंडे यांच्यावर या प्रकरणात वारंवार आरोप होत आहेत. त्यामुळे त्यांनी या प्रकरणात अधिक बोलंणार नसल्याचे म्हटले आहे. संतोष देशमुख यांच्या प्रकरणात मी कोणतेही उत्तर देणार नाही. कृपा करून मला याबाबतचे प्रश्न मला विचारू नका, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी याविषयी बोलणे टाळले आहे. संतोष देशमुख यांची निर्घुन हत्या केली आहे. या प्रकरणाची फास्ट कोर्टात केस लढवावी आणि आरोपींना तात्काळ फाशी द्यावी, अशी मागणी मी या आधी देखील केली होती. त्यामुळे मला याबाबत काहीही विचारु नका. या प्रकरणात कोणी काय म्हणावे? काय बोलावे? हा वेगळा विषय आहे. केवळ न्यूज व्हॅल्यू वाढवण्यासाठी याविषयी चर्चा केली जात असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. पोलिस अतिशय व्यवस्थित त्यांने काम करत असल्याचा दावा देखील मुंडे यांनी केला आहे. अंजली दमानियांच्या आरोपांवर अधिकचे बोलणे टाळले संत वामन भाऊ यांच्या 49 व्या पुण्यतिथी निमित्त मंत्री धनंजय मुंडे यांनी समाधीचे दर्शन घेतले. मी दरवर्षी पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी या ठिकाणी मुक्कामाला येत असल्याचे मुंडे यांनी सांगितले. आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्या क्षेत्रात आपल्या हातून जनतेची सेवा घडो, अशीच कामना देवासमोर केली असल्याचे देखील धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. गरिबातील गरीब माणसांची सेवा आपल्या हातातून घडावी. नतमस्तक होत मी हीच मागणी केली असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. या वेळी त्यांना माध्यमांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांवर प्रश्न विचारले होते. मात्र त्यांनी याबाबत अधिकचे बोलणे टाळले आहे. वाल्मीक कराडला आज न्यायालयात हजर करण्यात येणार बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेला वाल्मीक कराड याची सीआयडी कोठडी आज संपत आहे. त्यामुळे त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी व्हीसीद्वारे सुनावणी घेण्याचे तयारी केली आहे. मात्र आता त्याला पुन्हा सीआयडी कोठडी मिळते की, न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी केली जाते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खंडणी मागितली त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज समोर बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी निगडीत खंडणी प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागितली त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. संतोष देशमुख हत्याकांड आणि खंडणी प्रकरणातील सर्व आरोपी या सीसीटीव्हीच्या फ्रेममध्ये एकत्र कैद झाले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे काही पोलिस अधिकारीही त्यांच्यासोबत दिसत आहेत. हे सीसीटीव्ही फुटेज मोठा पुरावा मानले जात आहे.