ओबीसींवरील अत्याचारावेळी OBC नेते कुठे असतात?:महाबोधी मुक्ती चळवळीबाबत मोदी सरकारचे मौन भारतविरोधी – प्रकाश आंबेडकर

निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी नेते मिरवताना दिसतात. पण प्रत्यक्षात ओबीसींवरील अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्याची वेळ येते तेव्हा हेच ओबीसी नेते कुठे गायब होतात? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका धनगर समाजाच्या कैलास बोऱ्हाडे यांच्यावर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बोलत होते. या घटनेतील दोषींवर तत्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी आंबेडकर यांनी केली आहे. ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, छगन भुजबळ, नवनाथ पडळकर, लक्ष्मण हाके, पंकजा मुंडे हे स्वतःला ओबीसींचे नेतृत्व करणारे म्हणवतात. मात्र, ओबीसी समाजावर अन्याय होत असताना हे कुठे असतात? जालना येथील या गंभीर घटनेकडे या नेत्यांनी अजूनही गांभीर्याने पाहिलेले नाही, ही बाब दुर्दैवी आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्या गावाला भेट दिली असून, पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. मात्र, केवळ एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मागितली असून, लवकरात लवकर कठोर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे. अमानुष घटना पाहणाऱ्या गावावर दंड बसवा या संदर्भात जालना जिल्ह्यातील ओबीसी संघटनांशी चर्चा झाली असून, त्यांनी 6 तारखेला मोर्चा आयोजित केला आहे. शासनाने तातडीने दोषींना अटक करावी, तसेच गावकऱ्यांनी ही अमानुष घटना उघड्या डोळ्यांनी पाहिली आहे, तर त्या गावावर सामूहिक दंड बसवावा, अशी मागणी ॲड. आंबेडकर यांनी केली आहे. तसेच तुम्ही जे पेरता, तेच उगवते. धार्मिक द्वेष पसरवल्याने राज्यातील सामाजिक सलोखा बिघडत आहे, अशी खंत ॲड. आंबेडकर यांनी या वेळी व्यक्त केली.
महाबोधी मुक्ती चळवळीबाबत मोदी सरकारचे मौन भारतविरोधी बिहारमधील बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती चळवळ सध्या बौद्ध समाजाच्या महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी संघर्ष करत आहे. या चळवळीला देशभरातील तसेच परदेशातील बौद्ध समाजाचा मोठा पाठिंबा मिळत आहे. वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा या दोन्ही संघटनांनी या चळवळीला वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा यांनी पूर्ण पाठिंबा जाहीर केला असल्याचे वंचित बहुजन बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. बौद्ध धर्म भारताच्या परराष्ट्र धोरणासाठी महत्त्वाचा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या आंदोलनावर बारकाईने लक्ष ठेवले असून चळवळीच्या मागण्यांना न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. महाबोधी मंदिर मुक्ती ही केवळ धार्मिक बाब नसून, ती भारताच्या राजनैतिक, सांस्कृतिक आणि परराष्ट्र संबंधांशी संबंधित महत्त्वाची चळवळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार या प्रचंड चळवळीच्या मागण्यांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत आहे. बौद्ध धर्म हा भारताच्या परराष्ट्र धोरणासाठी महत्त्वाचा आहे. भारताच्या बौद्धधर्मीय भागीदारीमुळे जपान, मंगोलिया, व्हिएतनाम, दक्षिण कोरिया, थायलंड, म्यानमार, श्रीलंका, नेपाळ आणि कंबोडिया यासारख्या देशांशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाले असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे. देशातील विरोधी पक्षांचेही या आंदोलनाकडे दुर्लक्ष मोदी सरकारचे दुर्लक्ष हे केवळ भारतातील बौद्ध समाजाच्या भावनांचा अपमान नसून, भारताच्या राजनैतिक कूटनीति आणि परराष्ट्र संबंधांवरही घातक परिणाम करू शकते अशी शंका आंबेडकरांनी व्यक्त केली आहे. अधिक दु:खाची बाब म्हणजे देशातील विरोधी पक्षांनीही या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे. असे म्हणत ॲड. आंबेडकरांनी आम्ही केंद्र सरकारला महाबोधी महाविहार मुक्ती चळवळीच्या मागण्यांना तातडीने मान्यता द्यावी आणि बौद्ध समाजाच्या भावनांचा सन्मान राखावा अशी विनंती केली आहे. वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा या चळवळीला अखेरपर्यंत पाठिंबा देत राहतील आणि बौद्ध समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करतील. असेही ॲड. आंबेडकरांनी सांगितले.

Share

-