ओ दादा धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा:त्याने बीड जिल्हा नासवून टाकला, मस्साजोगमध्ये अजित पवारांसमोर ग्रामस्थांची घोषणाबाजी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. अजित पवार मस्साजोगमध्ये आल्यानंतर ग्रामस्थांनी धनंजय मुंडेंच्या विरोधात घोषणाबाजी केली. ओ दादा धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाका, त्याने बीड जिल्हा नासवून टाकला, अशी मागणी यावेळी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्य ढवळून निघाले आहे. हिवाळी अधिवेशनातही विरोधकांनी या प्रकरणावरून आवाज उठवला होता. आज संतोष देशमुख यांचा आज तेराव्याचा दिवस होता. अधिवेशन संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले. आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही अजित पवार यांनी कुटुंबीयांना दिले. अजित पवार गावातून निघाले असता ग्रामस्थांनी त्यांच्याकडे धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली. काय म्हणाले ग्रामस्थ?
अजित पवार देशमुख कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर ताफ्याकडे जात असताना धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाका, ओ दादा, धनंजय मुंडेंला मंत्रिपद देऊ नका. त्याला कोणतेही पद देऊ नका. दादा, जनतेचे म्हणणं ऐकून घ्या, त्याच्या एकट्यामुळे सगळे मयत झाले आहे. हे सगळे कुत्रे आहे. धनंजय मुंडेंनी लय पक्षपात केला आहे, त्याने बीड जिल्हा नासवून टाकला आहे, त्या मंत्रिपद देऊ नकाए अशी पोटतिडकीने गावकऱ्यांनी अजित पवारांकडे मागणी केली. …तर मग नागपूरमधूनच बोलायचे असते
अजितदादा काहीच बोलले नाही. साधे बोलले, सारवासारव केली आणि निघून गेले. संतोष देशमुख यांच्या हत्येला 13 दिवस झाले आहे. अजून 4 आरोपी फरार आहे. पण अजूनही एकालाही पकडले नाही. त्यांनी गावातील लोकांची कार्यकर्त्यांचं म्हणणे ऐकून घ्यायला पाहिजे होते. आमचे काही ऐकून घ्यायचे नव्हते, तर मग नागपूरमधूनच बोलायचे असते. अजितदादांनी दिलेले आश्वासन मान्य नाही. असे यायचे सांगून जायचे फक्त हे आम्हाला पटले नाही, असे म्हणत ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला. शरद पवारांनीही घेतली देशमुख कुटुंबीयांची भेट
दरम्यान, अजित पवार यांच्या आधी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. या घटनेच्या खोलात गेले पाहिजे, या घटनेचा सूत्रधार कोण आहे? याचा शोध घेतला पाहिजे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार या प्रकरणाच्या खोलात जाईपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही, असे शरद पवार यावेळी म्हणाले होते.

Share

-