पालकमंत्री पदावर तोडगा निघणार का?:एकनाथ शिंदेंची प्रथम अजित पवारांशी चर्चा, नंतर थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

महाराष्ट्रात पालकमंत्री पदावरून महायुती सरकारमध्ये सध्या चांगलेच मतभेद व नाराजी नाट्य दिसून येत आहे. यात मतभेदामुळेच रायगड आणि नाशिक येथील पालकमंत्री पदांवरील नावांना स्थगिती देण्यात आली आहे. यावर आता लवकरच तोडगा निघणार असल्याचे दिसत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली होती आता एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा सुरू असल्याचे समजते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा सुरू असून रायगड तसेच नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबद्दल तोडगा निघण्याची शक्यता आहे. रायगड येथे शिवसेना नेते व आमदार भरत गोगावले आणि नाशिक येथे शिवसेना आमदार दादा भुसे यांनी पालकमंत्री पदासाठी दावा केला आहे. मात्र रायगड येथे अजित पवार गटाच्या आमदार अदिती तटकरे तर नाशिकसाठी भाजप आमदार गिरीश महाजन यांची निवड करण्यात आली होती. यावर शिवसेनेने जोरदार विरोध दर्शवला असून एकनाथ शिंदे यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. रायगड जिल्ह्यात भरत गोगावले यांच्या जवळपास 32 समर्थक व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत थेट राजीनामा देखील दिला. इतकेच नव्हेत तर मुंबई महामार्गावर टायर जाळत अदिती तटकरे यांना पालकमंत्री पदावर निवडल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला होता. यातून भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यात देखील वाद समोर आला आहे. प्रजासत्ताक दिनी आमदार भरत गोगावले यांनी झेंडावंदनावरून झालेल्या वादावर भाष्य करताना म्हटले होते की, जर मी काही चुकीचे केले असेल तर राजीनामा द्यायला तयार आहे. त्यांनी यावेळी सुनील तटकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्ष हल्लाबोल केला. भरत गोगावले म्हणाले, जो भावाचा नाही झाला तो आमचा काय होणार? आव्हान स्वीकारून चालतो तोच यशस्वी होतो. आमदार महेंद्र दळवी यांनीही सुनील तटकरे आणि त्यांच्या कन्या आदिती तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे होत्या. त्यांना वैतागून रायगड जिल्ह्यातील तीन आमदारांनी उठाव केला आणि त्यानंतर गुवाहाटीचे लोण संपूर्ण राज्यात पसरले. त्यामुळेच राज्यात सत्ता बदल घडून आला. महेंद्र दळवी पुढे म्हणाले, सत्ता बदल होऊनही सुनील तटकरे यांनी महायुती सरकारमध्ये मागच्या दाराने प्रवेश केला. त्यांनी आपल्या मुलीला मंत्री बनवले, पण पालकमंत्री मात्र उदय सामंत होते. आता पुन्हा महायुतीची सत्ता आल्यानंतर सुनील तटकरे यांनी आपल्या मुलीला पालकमंत्रीपद मिळवून दिले. त्यांच्याकडे नेमकी काय जादू आहे, हे आम्हाला कळत नाही. आम्ही भरत गोगावले यांचे नाव पालकमंत्रीपदासाठी फायनल केले होते, पण रात्रीतून ते कसे बदलले, याचा आम्हाला प्रश्न आहे. दरम्यान, आता एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात चर्चा सुरू असून यातून काय तोडगा निघतो याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. महायुतीची राज्यात सत्ता आली असली तरी घटक पक्षात मंत्रिपदावरून अनेक मतभेद समोर आले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार देखील लांबला होता. आता पालकमंत्री पदावर कसा तोडगा निघतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Share

-