पाणीपुरी खाल्ल्याने 30 जणांना झाली विषबाधा:तुमसर तालुक्यातील सुकळी येथील प्रकार; सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर

जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील सुकळी (दे) येथे ९ मार्च रोजी आयोजित एका समारंभात अन्न व पाणीपुरी विकणाऱ्या कडून पाणीपुरी खाल्ल्याने जवळपास ३० जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार १० मार्च रोजी सकाळी समोर आला. यात २२ जणांना उपचारार्थ बेटाळा व देव्हाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात तर उर्वरित आठ जणांना आंधळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन सुट्टी देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, सुकळी (दे) येथे ९ मार्च रोजी एका समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी अन्न वितरण करण्यात आले. काहींनी कार्यक्रमाजवळ असलेल्या ठिकाणी पाणीपुरी विक्रेत्यांकडील पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी व अन्नातून तब्बल तीस लोकांना विषबाधा झाल्याचे समोर आले. परिणामी, येथील महिला, पुरुष व लहान बालकांना उलटी-जुलाबाचा त्रास सुरु झाला. १० मार्च रोजी सकाळी हा प्रकार हळूहळू समोर आल्याने एकच खळबळ उडाली. विषबाधा झालेल्या रुग्णांना प्रथम बेटाळा व देव्हाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर काहींना आंधळगाव येथील डॉ. अनिकेत सपाटे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर योग्य औषधोपचार करून त्यांना मंगळवार, ११ मार्चला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. विषबाधा झालेल्या तीसही रुग्णांची प्रकृती बरी असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, विषबाधा झालेल्यांमध्ये हर्षदा नान्हे, तन्हू नान्हे, अश्विनी बुरडे, कविता डोळस, अक्षय डोळस, निहार बांडेबुचे, श्रेयश ठवकर, रियांश ठवकर, कौशिक जगनाडे, दिवेश शहारे, भावेश राऊत, सुप्रिया नेरकर, प्रियांशी राऊत, कांता राऊत, मनीषा राऊत, संकेत राऊत, रेखा राऊत, प्रज्वल भुरे, योगेश शहारे, प्रतीक शहारे, संजय शेंडे, मंगेश शेंडे, वर्षा डोळस, श्रेया डोळस, सतीश मुंडे (सर्व रा. सुकळी) व इतरांचा समावेश आहे सर्वांची प्रकृती स्थिर अन्नातून व पाणी पुरीतून ही विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. उपचारांसाठी बेटाळा व देव्हाडी आरोग्य केंद्रात तर काहींना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर आहे, असे प्राथमिक आरोग्य केंद्र, देव्हाडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. आर. रहांगडाले यांनी सांगितले.

Share

-