पंकजा मुंडे:भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार म्हणून ओळख; फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात दुसऱ्यांदा वर्णी

भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार म्हणून ओळख असलेल्या पंकजा मुंडे यांना घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय प्रवास सुरु करणाऱ्या पंकजा मुंडे यांची आता देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. वास्तविक गोपीनाथ मुंडे पहिल्यांदाच लोकसभेत गेल्यानंतर 2009 साली पंकजा मुंडे यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. त्यांच्या वडिलांनी लोकसभेमध्ये विजय मिळवल्यानंतर पंकजा मुंडे यांना परळी विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. वडिल्यांच्या छत्रछायेखाली आणि मार्गदर्शनाखाली पंकजा मुंडे यांनी आपली कारकीर्द सुरु केली. मात्र, 2013 मध्ये पंकजा मुंडे यांचे सख्खे चुलत भाऊ असणारे धनंजय मुंडे यांची नाराजी उघड झाली. त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंसमोर आव्हान निर्माण केले. त्यावर मात करत 2014 मध्येही त्या आमदार झाल्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी महिला व बालकल्याण मंत्रीपदाची धुरा त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली. 2019 साली पुन्हा या दोन्ही बहिण भावामध्ये लढत झाली. यामध्ये पंकजा मुंडेंचा पराभव झाला. तेव्हापासून पंकजा यांचा राजकीय पिछेहाट सुरु झाली असेच म्हणावे लागेल. त्यानंतर पंकजा मुंडे वेगवेगळ्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत राहिल्या. पण राज्याच्या राजकारणात त्यांचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. पंकजा मुंडे यांनी त्यानंतर पक्षीय राजकारणावर जास्त भर दिला. 2020 साली पंकजा मुंडे यांना मध्यप्रदेशच्या सहप्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली. या निवडणुकीत मध्य प्रदेशमध्ये भाजपने विजयी पताका फडकवली. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय सचिव म्हणून देखील त्यांनी जबाबदारी पार पडली. यामुळे त्या दिल्लीत जातील अशी चर्चा सुरु झाली. यातच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारही देण्यात आली. मात्र, या वेळी देखील त्यांचा पराभव झाला. अखेर भाजपच्या वतीने त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे.

Share

-