पवनीत रंगला किन्नर महोत्सव:धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचा अनोखा संगम; देशभरातील हजारो किन्नर बांधवांचा सहभाग

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवनीत किन्नर महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. श्रीक्षेत्र वैजेश्वर धाम येथे पार पडलेल्या या महोत्सवात देशभरातील हजारो किन्नर बांधवांनी सहभाग घेतला. यात भव्य शोभायात्रा, वैनगंगेची महाआरती आणि रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून किन्नर समाजाच्या संस्कृतीचा अनोखा ठेवा अनुभवता आला. या महोत्सवाची सुरवात भव्य शोभायात्रेने झाली. अघोरी शिवतांडव, गरबा नृत्य आणि पारंपरिक लोककलांचे सादरीकरण पाहण्यासाठी हजारोंचा जनसागर लोटला होता. विविध आकर्षक वेशभूषांमध्ये सहभागी झालेल्या किन्नर बांधवांनी आपल्या नृत्य-कला आणि भक्तिभावाने उपस्थितांचे मन जिंकले. त्यानंतर या आगळ्यावेगळ्या महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महामंडलेश्वर मातंगी मंदागिरी माई आणि महामंडलेश्वर पवित्रा नंदागिरी माई यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन झाले. सायंकाळी किन्नर भक्तांच्या उपस्थितीत वैनगंगेच्या पवित्र काठावर भव्य महाआरती झाली. दिव्यांच्या प्रकाशात न्हालेल्या आरतीमुळे वातावरण भक्तिमय झाले. उपस्थित भाविकांनी या ऐतिहासिक क्षणाचा लाभ घेतला. महामंडलेश्वर मातंगी मंदागिरी माई आणि महामंडलेश्वर पवित्रा नंदागिरी माई यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गदीं केली होती. रात्री ८ वाजता होलिकादहन सोहळा पार पडला. ज्यामध्ये समाजातील वाईट प्रवृत्तींचा नाश आणि नवचैतन्याचे स्वागत या संकल्पनेला उजाळा देण्यात आला. त्यानंतर पारंपरिक नृत्य, लोकसंगीत आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली किन्नर संस्कृतीची ओळख किन्नर समाजाच्या नृत्य, संगीत आणि पारंपरिक कलेला प्राचीन इतिहास आहे. विदर्भकाशी किन्नर महोत्सवाच्या निमित्ताने हा सांस्कृतिक ठेवा मोठ्या उत्साहात सादर करण्यात आला. किन्नर कलावंतांनी पारंपारिक गीत, संगीत नृत्याचे बहारदार सादरीकरण करून लोकांचना भुरळ पाडली. हा महोत्सव केवळ मनोरंजन नव्हे, तर समाजाच्या विविधतेचा सन्मान आणि एकतेचा संदेश देणारा उत्सव ठरला. देशभरातील किन्नरांची उपस्थिती या महोत्सवात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, ओडिशा, तेलंगणा, बिहारसह संपूर्ण भारतातून किन्नर समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले. अनोखा किन्नर समाज हा भास्तीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असून, त्यांच्या परंपरा, नृत्य आणि कला यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना किन्नर समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख झाली. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी उद्योजक तोमेश्वर पंचभाई राजेश मेश्राम, हर्षल वाघमारे, किशोर पंचभाई, पंकज रेवतकर, महादेव लिचडे, यशवंत देशमुख, स्वर्णदीप वालदेकर, दत्तू हटवार यांनी परिश्रम घेतले. तसेच वैजेश्वर देवस्थान ट्रस्ट, विदर्भ युवा क्रांती संघटना आणि अनेक सामाजिक संस्थांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.

Share

-