नियोजनबद्ध प्रचार यंत्रणेच्या जोरावर नेवाशात शिवसेनेच्या लंघेंचा विजय:भाजपचे सचिन देसरडा, प्रभाकर शिंदे व राष्ट्रवादीचे शेख ठरले किंगमेकर

निवडणुकीतील रणधुमाळीत नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा महत्त्वाची असते. नेवासे विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांच्या प्रचार यंत्रणेत भाजपचे विधानसभा संयोजक सचिन देसरडा, प्रभाकर शिंदे व लाडकी बहीण योजनेसाठी कष्ट घेतलेले अब्दुल शेख हे राजकीय किंगमेकर ठरले आहेत. प्रभावी प्रचार यंत्रणेने लंघे यांना विजयाच्या यशाला गवसणी घातली. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा यांनी नियोजनपूर्वक प्रचाराची धुरा सांभाळली. नेवासे फाट्यावरील मुख्यमंत्री शिंदे यांची, तर घोडेगावची खासदार श्रीकांत शिंदे यांची, तर कुकाण्यातील माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या सभा प्रभावी ठरल्या. घोडेगावची सभा देसरडा यांच्या नियोजनात पार पडली, तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेसाठी देसरडा यांना पंचगंगाचे प्रभाकर शिंदे यांचे मार्गदर्शन, तर कुकाण्यातील दानवे यांच्या सभेसाठी अब्दुल शेख यांचे सहकार्य मिळाले. घोडेगाव, सोनई परिसरात सचिन देसरडा यांनी मतदारांपर्यंत लंघेसाठी महायुतीच्या जनहिताच्या योजनाची माहिती दारोदारी पटवून दिली. तालुक्यातील सर्व सभा, प्रचारफेऱ्या याचे नियोजन देसरडा यांनी केले. सोशल मीडियावरील प्रचार यंत्रणेसाठी देसरडा यांनी सहकार्य करत महत्त्वाची भूमिका बजावली. स्वतःचा उमेदवारी अर्ज माघारीपासून ते लंघे निवडणुकीत यश घेईपर्यंत देसरडा यांनी केलेली राजकीय व्युहरचना लंघे यांच्यासाठी लाभदायी ठरली. कुकाण्यातील अब्दुलभाई शेख यांनी लाडकी बहीण योजनेसाठी स्वतः कार्यालय थाटून वीस हजारांहून अधिक महिलांचे अर्ज भरून सहकार्य केले. त्या अब्दुलभाई यांनीही लंघे यांच्यासाठी स्वतः राष्ट्रवादीची मिळालेली उमेदवारी मागे घेत लंघे यांना पाठबळ दिले. शिवाय तालुक्यातील महायुतीच्या सभेसाठी महिलांची लक्षणीय उपस्थिती शेख यांच्या परिश्रमाने दिसून आली. या तिघांच्या नियोजनपूर्वक कामाने लंघे यांचा विजय साकारला.

Share

-