योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’च्या नाऱ्यामुळे मतांचे ध्रुवीकरण:लाडकी बहीण योजनेचा अपप्रचार, निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार कराड येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. जशी अपेक्षा होती तसा हा निर्णय नाही, शेवटी लोकांनी दिलेला हा निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी निवडणुकीच्या निकालावर दिली आहे. पराभव का झाला याची माहिती घेणे, त्याची कारणमीमांसा करणे आणि नव्या जोमाने पुन्हा लढावे, असेही शरद पवार म्हणाले. सत्ता दिली नाही तर योजना बंद करणार लाडक्या बहीणीवर बोलताना शरद पवार म्हणाले, की ही योजना केवल निवडणुकीसाठी होती. तसेच आम्ही सत्तेत असलो तर ही योजना सुरू राहील. योजना सुरू ठेवायची असेल तर आम्हाला मतदान करा, सत्ता दिली नाही तर योजना बंद करणार असे त्यांनी प्रचार सभेत बोलताना जनतेला व लाडक्या बहिणींना सांगितले होते, त्यामुळे याचा परिणाम निवडणुकीवर झाला, असे शरद पवार म्हणाले. हवा तसा निकाल समोर आला नाही महाराष्ट्रात जवळपास सगळ्या जिल्ह्यात फिरलो. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली, परंतु हवा तसा निकाल समोर आला नाही, अशी खंत शरद पवारांनी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीने जातीचे राजकारण केले असा आरोप केला जात आहे, यावर बोलताना शरद पवारांनी यावर माझ्याकडे संपूर्ण माहिती नसल्याचे उत्तर दिले. बटेंगे तो कटेंगे अशा घोषणांमुळे राज्यात मतांचे ध्रुवीकरण लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या गटाला लोकांनी मतदान केले. विधानसभा निवडणुकीत मात्र अजित पवारांना मोठ्या मतांनी निवडून दिले आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, हे असे का झाले यावर अभ्यास करणे गरजेचे आहे. तसेच पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, अधिकृत माहिती आल्याशिवाय इव्हीएम मशीनवर बोलणार नाही. बटेंगे तो कटेंगे अशा घोषणांमुळे राज्यात मतांचे ध्रुवीकरण करण्यात झाले, असा आरोप शरद पवारांनी महायुतीवर लावला आहे. घरी बसणार नाही, नव्या जोमाने पुन्हा लढणार अजित पवार आणि युगेंद्र पवार यांची तुलना होऊ शकत नाही, अजित पवारांना यश मिळाले हे मान्य करण्यात गैर काही नाही, असे स्पष्ट मत शरद पवारांनी व्यक्त केले आहे. लोकांनी दिलेल्या निर्णयाचा अभ्यास करणार तसेच घरी बसणार नाही, नव्या जोमाने पुन्हा लढणार, कर्तुत्ववान नवी पिढी तयार करणार, असा विश्वास देखील शरद पवारांनी व्यक्त केला आहे. आमच्यातून बाहेर गेलेल्यांना निवडणुकीत चांगले यश मिळाले. महाविकास आघाडीला देखील चांगला प्रतिसाद मिळत होता. विरोधी पक्ष नेते पदावर बसण्यासाठी तेवढे संख्याबळ नसल्याचे देखील पवार म्हणाले.