प्रशांत कोरटकर शिवनी, बालाघाट मार्गे मध्य प्रदेशात?:देवदर्शन आणि पर्यटन सुरु; अटकपूर्व जामीन अर्जासाठी देखील हालचाली

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्या प्रकरणी आरोप असलेले प्रशांत कोरटकर हे शिवनी, बालाघाट मार्गे मध्य प्रदेशला गेले असून त्यांनी पुढे देवदर्शन घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नाही तर आपल्या जामीन अर्जासाठी त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. सध्या प्रशांत कोरटकर यांचे फोन बंद असून ते एकाच ठिकाणी खूप काळ मुक्काम करत नसल्याची माहिती देखील समोर येत आहे. सतत प्रवासाच्या माध्यमातून ते देवदर्शन आणि पर्यटन करत असल्याने ते पोलिसांना देखील हुलकावणी देत आहेत. सध्या नागपूर पोलिसांची दोन पथके तसेच कोल्हापूर पोलिसांचे पथक प्रशांत कोरटकर यांचा शोध घेत आहेत. याबाबत गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत कोरटकर हे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत आहेत. इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्या प्रकरणात तो आवाज आपला नाही असा दावा प्रशांत कोरटकर यांनी केला होता. मात्र, असे असताना ते फरार का आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच प्रशांत कोरटकर आपल्या आवाजाचे नमुने पोलिसांना देऊन या प्रकरणाची वस्तुस्थिती पुढे आणायला पोलिसांना सहकार्य का करत नाहीत? हा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. नेमके प्रकरण काय? इतिहास अभ्यासक आणि संशोधक इंद्रजीत सावंत यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाबाबत केलेल्या मांडणीवरुन त्यांना धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीने सोमवारी मध्यरात्री 12 ते 1 च्या सुमारास फोनवरून मला घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिली. त्याने मला दोनवेळा फोन करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. पहिला फोन आल्यानंतर मी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष दिले नाही. पण दुसऱ्या फोनमध्ये सदर व्यक्तीने आपल्या सर्व मर्यादा ओलांडल्या. जिथे असेल तिथे घरी येऊन बघून घेईन, असे हा व्यक्ती म्हणाला, असे इंद्रजीत सावंत यांनी सांगितले आहे. मा. मुख्यमंत्री यांचे नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचा एक परशूरामी ब्राxx धमक्या देत आहे, असेही इंद्रजीत सावंत म्हणालेत. प्रशांत कोरटकरने फेटाळले आरोप प्रशांत कोरटकर यांनी इंद्रजीत सावंत यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. मी इंद्रजीत सावंत यांना ओळखत नाही. माझ्या नावाने कुणीतरी खोडसाळपणा केला असेल. नवीन तंत्रज्ञानाचा गैरवापर करून कुणीतरी फसवण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी 15 वेळा माझे फेसबुक हॅक करण्यात आले. माझा नंबरही यापूर्वी हॅक झाला होता. सावंत यांनी आपल्याशी बोलून फेसबुक पोस्ट करण्याची गरज होती, असे ते म्हणालेत. ‘छावा’वर काय म्हणाले होते सावंत? विकी कौशल व रश्मिका मंदाना अभिनीत छावा चित्रपट हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जिवनावर आधारित आहे. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी या चित्रपटावर भाष्य करत त्यात इतिहासाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला होता. छावा सिनेमात इतिहासाचे वेगळ्या पद्धतीने दर्शन झाले आहे. त्यात सोयरा बाईसाहेबांना खलनायक दाखवण्यात आले. मुळात अण्णाजी दत्तो हे छत्रपती संभाजी महाराजांचे खरे खलनायक होते. विकीपिडियावर जो खोटा इतिहास लिहिला जात आहे तो काढून टाकण्याची गरज आहे, असे ते म्हणालेत.