प्रशांत कोरटकर यांच्याकडे महेश मोतेवार यांची संपत्ती:आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप; अडचणी आणखी वाढण्याची शक्यता

इतिहास संशोधक इंद्रजीत यांना धमकी देण्याचा आरोप असलेले प्रशांत कोरटकर यांच्याकडे महेश मोतेवार याची संपत्ती असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या संदर्भात रोहित पवार यांनी भाजपवर देखील निशाणा साधला आहे. सत्तेतील नेत्यांसोबत उठबस असल्याने आपल्याला कोणीही काही करू शकत नसल्याचा विश्वास असल्यानेच त्याची विकृत हिम्मत वाढली असल्याचा आरोपही आमदार पवार यांनी केला आहे. छावा चित्रपटाविरोधात भाष्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर नामक एका व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात कोरटकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप होत आहेत. छावा संघटना देखील या प्रकरणावरुन आक्रमक झाली आहे. त्यातच आता कोरटकर यांच्याकडे मातेवारची संपत्ती असल्याचा दावा देखील केला जात आहे. त्यामुळे त्याच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप आणि कोरटकर यांच्यावर निशाणा रोहित पवार यांनी या संदर्भात एक पोस्ट शेअर करत भाजप आणि कोरटकर यांच्यावर निशाणा साधला. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, ज्या महेश मोतेवारने लाखो लोकांना हजारो कोटींचा गंडा घातला त्याच्या गाड्या आणि पैसे कोरटकरकडे असून महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या माजी राज्यपाल कोशारी साहेबांपासून तर केंद्र तसेच राज्य सरकारमधील मोठ्या नेत्यांसोबत कोरटकरची उठबस असल्याची माहिती समोर येत आहे, शिवाय गुवाहाटीत देखील कोरटकर हजर होता, अशी चर्चा आहे. कदाचित सत्तेतील नेत्यांशी उठबस असल्याने आपल्याला कोणीही काही करू शकत नाही याचा विश्वास कोरटकरला आहे, म्हणूनच कोरटकर सारख्या विकृत प्रवृत्तींची हिम्मत वाढत असावी. महान व्यक्तींच्या नावाने राजकारण करणारे हे सरकार महान व्यक्तींचा अपमान करणाऱ्या कोरटकरसारख्या प्रवृत्तींना खाक्या दाखवणार की त्याची सेवा करण्यातच धन्यता मानणार हे पहावं लागेल. नेत्यांवर टीका केली म्हणून धरपकड करणारे सरकार महान व्यक्तींबद्दल अभद्र भाषा वापरणाऱ्या विकृतांवर कारवाई करत नाही, हे मात्र दुर्दैव आहे! नेमके प्रकरण काय?
छावा चित्रपटाविरोधात भाष्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर नामक एका व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. सावंत यांनी स्वतः या प्रकरणी एक ऑडिओ क्लिप सार्वजनिक केली आहे. मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचा एक परशूरामी ब्राxx धमक्या देत आहे. मला अशा धमक्या नवीन नाहीत. पण या लोकांच्या मनात शिवाजी महाराजांविषयी किती विष भरलेले आहे हे झोपलेल्या मराठा बहुजनांना समजावे म्हणून मी ही रेकॉर्डिंग व्हायरल करत आहे, असे सावंत यांनी म्हटले होते. इंद्रजीत सावंत यांनी छावा चित्रपटाविषयी माध्यमांशी संवाद साधताना कथितपणे ब्राह्मणद्वेषी विचार मांडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी प्रशांत कोरटकर नामक नागपूरच्या व्यक्तीने फोन करून त्यांना धमकी दिली आहे. इंद्रजीत सावंत यांनी स्वतः यासंबंधीची ऑडिओ क्लिप जाहीर करत तसा दावा केला आहे. त्यानंतर या प्ररकणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.