प्रेमाने मागा सगळे देऊन टाकू:सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याची चर्चा; ‘खाली हात आये थे, खाली हात जायेंगे’ म्हणत पदाची महत्त्वकांक्षा नसल्याचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट तयार झाले आहेत. यातील शरद पवार यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत तर अजित पवार यांच्या पक्षाला विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे. या दरम्यान दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. यातच आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक वक्तव्य केले आहे. ‘प्रेमाने मागा सगळे देऊन टाकू’ तसेच ‘खाली हात आये थे, खाली हात जायेंगे’ असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, निवडणुका येतात आणि जातात. मात्र जे कायमचे राहत नसते. मला कोणत्याही पदासाठी महत्त्वकांक्षा नाही. मात्र जे काय सुरू आहे ते अनेकांना पटत नसल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे. सुप्रिया सुळे या सध्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी देखील विविध विषयावर संवाद साधला. जनता सोबत असेल तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे उदाहरण देखील यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिले. माझ्या निवडणुकीतून हे लक्षात आले की कोणी आपल्या सोबत असले तरी चालेल किंवा नसले तरी चालेल. मात्र जनता आपल्या सोबत असायला हवी. जनता तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. लोकसभा निवडणुकीत सर्व यंत्रणा माझ्या विरोधात होती. आमदार, खासदार, सरपंच सुद्धा माझ्या विरोधात होते. मात्र तरी देखील जनतेने मला निवडून दिले असल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे. शरद पवार कधी रिटायर्ड होतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी आता निवृत्ती घ्यावी, अशी चर्चा वारंवार होत असते. यातच शरद पवार यांनी मात्र मी निवृत्ती घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावर देखील सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे. माझे वडील कधी रिटायर्ड होतील, असे अनेकांना वाटते. मात्र ते कधी रिटायर्ड होतील, हे मला माहीत नाही. असे देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

Share

-