पंतप्रधान नरेंद्र मोदींना बॉम्बने उडवण्याची आली धमकी:पाकिस्तानी एजंट रचत आहेत कट, मुंबई पोलिसांना आला मेसेज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बॉम्बने उडवण्याची धमकी असणारा एक मेसेज शनिवारी मुंबई पोलिसांना मिळाला. पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे दोन एजंट पंतप्रधान मोदींना बॉम्बने उडवण्याचा कट आखत असल्याचे या मेसेजमध्ये लिहिले होते. मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनवर हा मेसेज आला होता. हा मेसेज मिळताच मुंबई पोलिस सतर्क झाली आहे. या विषयी सांगताना एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, ज्या नंबरवरून हा मेसेज आला, त्याचा तपास आम्ही केला आहे. हा नंबर राजस्थानच्या अजमेर इथला असल्याचे आम्हाला समजले. तसेच संशयिताला पकडण्यासाठी एक पथक तातडीने राजस्थानकडे रवाना करण्यात आले असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. पुढे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आमच्या वाहतूक नियंत्रण पथकाच्या हेल्पलाइनवर हा धमकीचा मेसेज पहाटेच्या सुमारास मिळाला. या मेसेजमध्ये आयएसआयच्या दोन एजंटांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटासंदर्भात सांगण्यात आले आहे. या मेसेजनुसार, दोन एजंट पीएम मोदींना बॉम्बने उडवण्याचा कट आखत आहेत. तसेच धमकी देणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ अथवा दारूच्या नशेत असावी, असा संशय तपासकर्त्यांना आहे. प्रकरणाचा तपास अद्यापही सुरूच आहे. तथापि, संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय न्यायिक संहितेच्या कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे महत्वाचे म्हणजे, यापूर्वीही मुंबई पोलिसांच्या हेल्पलाइनवर असे धमकीचे कॉल आणि मेसेज आले असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्याने सांगितली आहे. दरम्यान, या पूर्वी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याच्या धमकीचे मेसेज पोलिसांना आले आहेत. यावर पोलिसांनी तातडीने कारवाई देखील केली आहे. आता या प्रकरणात देखील पोलिस तातडीने संशयित व्यक्तीचा शोध घेत अटक करतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Share

-