काँग्रेसची प्रतिमा खराब असताना पृथ्वीराज चव्हाणांवर मुख्यमंत्री पदाची धुरा:गांधी घराण्याशी निष्ठा आणि मराठा वादातीत चेहरा ठरले कारण
नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर मुख्यमंत्री झालेले अशोक चव्हाण यांचे नाव देखील आदर्श सोसायटी घोटाळ्यात समोर आले. अशावेळी महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे प्रतिमा अत्यंत खराब झाली होती. पक्षाची प्रतिमा परत एकदा उजळण्यासाठी काँग्रेसला एक स्वच्छ प्रतिमा असलेला चेहरा हवा होता. अशावेळी वादातीत चेहऱ्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी पुढे आले. वाद विरहित चेहरा आणि गांधी घराण्याशी असलेली निष्ठा तसेच मराठा चेहरा या सर्वांमुळे पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.11 नोव्हेंबर 2010 ते 28 सप्टेंबर 2014 या कार्यकाळात 3 वर्षे, 321 दिवस पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पाहुयात त्यांच्या कार्याचा आढावा. वडिलांकडून राजकीय वारसा पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म 17 मार्च 1946 रोजी इंदूरमध्ये झाला. पृथ्वीबाबा हे तीन भावंडांमधील सर्वात ज्येष्ठ आहेत. निरुपमा यादव-देशमुख आणि विद्युल्लता घोरपडे या त्यांच्या बहिणी आहेत. त्यांचे वडील दाजीसाहेब चव्हाण हे कराड लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. 1957 ते 1973 या काळात पंडित जवाहरलाल नेहरु, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी यासारख्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात दाजीसाहेब यांनीनी केंद्रीय मंत्रिपद देखील भूषवले आहे. दाजीसाहेब यांच्या निधनानंतर 1973 मध्ये रिक्त झालेल्या जागेच्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांच्या मातोश्री प्रेमला चव्हाण या निवडून आल्या. त्यानंतर सलग चार वेळा त्या लोकसभेवर निवडून आल्या. दिल्लीत शिक्षण झालेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनाही राजकारणाची गोडी लागली. कराड लोकसभेतून राजकीय कारकिर्दीची सुरुवात पृथ्वीराज चव्हाण यांनी 1991 मध्ये आपल्या पालकांनी जिंकलेली कराडची जागा जिंकून लोकसभेतून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. 1991, 1996 आणि 1998 असे सलग तीनदा ते या मतदारसंघातून विजयी झाले. मात्र, 1999 मध्ये त्यांना पराभव पत्कारावा लागला. पृथ्वीराज चव्हाण यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, विज्ञान मंत्रालय, कार्मिक मंत्रालय, सार्वजनिक तक्रार व निवृत्ती वेतन मंत्रालय, संसदीय कार्य मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाचे प्रभारी मंत्री म्हणून काम केले. स्वच्छ प्रतिमा आणि वादविरहित चेहरा 10 नोव्हेंबर 2010 रोजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ निवासस्थानी महाराष्ट्राच्या राजकारणावर खलबते सुरु होती. काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर झालेल्या आदर्श घोटाळ्यातील गंभीर आरोपानंतर त्यांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले होते. अशा वेळी काँग्रेसची राज्यातील जनतेमध्ये प्रतिमा डागाळली होती. ती पूर्ववत करण्यासाठी स्वच्छ प्रतिमा असलेल्या आणि पक्षातील बंडाळी हाताळणाऱ्या नेत्यांची निवड करणे क्रमप्राप्त होते. अशा वेळी सोनिया गांधी यांच्या प्रति असलेली अतुलनीय निष्ठा आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा विश्वास असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव समोर आले. त्यांची स्वच्छ प्रतिमा आणि वादविरहित चेहरा हे सर्व फायद्याचे ठरले. प्रणव मुखर्जी यांनी केली चव्हाण यांच्या नावाची घोषणा वास्तविक पृथ्वीराज चव्हाण हे शरद पवार यांचे कट्टर विरोधक म्हणूनही ओळखले जात. या सर्व पार्श्वभूमीवर सोनीया गांधींनी या नावाला पसंती दिली आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली. त्यानंतर महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली. चव्हाण हे मराठा असल्याने त्यांच्या नावाला अधिक वजन मिळाले. महाराष्ट्रात मराठा हे प्रबळ आहे आणि काँग्रेसला आशा होती की, चव्हाण हे मित्रपक्ष राष्ट्रवादीसोबत सत्तेची समीकरणे सांभाळतील. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 11 नोव्हेंबर 2010 रोजी पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजीव गांधी यांनी राजकारणात आणले पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म इंदूरमध्ये मराठी कुटुंबात झाला. त्यांचे आईवडीलही राजकारणात होते. त्यांचे वडील आनंदराव चव्हाण आणि आई प्रेमलाताई चव्हाण हे दोघेही काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते होते. त्यामुळे राजकारणाचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले होते. त्यांचे सातवीपर्यंतचं शिक्षण कराडच्या नगरपालिका शाळेत तर त्यापुढील शिक्षण दिल्लीत झाले. चव्हाणांनी बिट्स पिलानी येथून बी.ई. (ऑनर्स) ही पदवी मिळवली. त्यानंतर ते यूएसए मधील वर्कलेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी गेले. पदवी प्राप्त केल्यानंतर, त्यांनी काही वर्षे यूएसए मध्ये एरोस्पेस उद्योगात काम केले होते. ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला चव्हाण राजीव गांधींना भेटले आणि राजकारणात आले. गांधींनी चव्हाण यांना कराडमधून 1984 ची निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिले आणि ते विजयी झाले, त्यानंतर त्यांनी अनेक लोकसभा जिंकल्या. काँग्रेससाठी अत्यंत प्रतिकूल परस्थिती असताना पृथ्वीराज बाबांनी महाराष्ट्राची धुरा सांभाळली. सुसंस्कृत नेता अशी ओळख आजही कायम सुसंस्कृत व स्वच्छ चारित्र्याचा नेता म्हणून पृथ्वीराज चव्हाण पाहिले जाते. संयमी, उच्चशिक्षीत, प्रतिभावान यासारखी अशी कितीही बिरूदावली चव्हाण यांना सूट होते. मितभाषी राजकारणी म्हणूनही पृथ्वीराज चव्हाणांची ओळख आहे. ते कमी पण मुद्यांचे आणि मोजकेच बोलतात. आपण भले आणि आपलं काम भलं, हा विचार घेऊन ते काम करतात. राजकारणात चमकोगिरी किंवा पुढे पुढे करण्यात त्यांना काडीचाही रस नाही. तसेच आपण फार मोठे राजकारणी आहोत हे दाखविण्याचा प्रयत्नही ते करत नाहीत. अत्यंत साधी राहणी, शालीन, लो-प्रोफाईल राहणारे चव्हाण विरोधकांवरही केवळ वैचारिक व धोरणात्मकच टीका करतात. कोणावरही व्यक्तीगत टीका न करता केवळ त्यांच्या धोरणाला, विचाराला विरोध करतानाही त्यांच्यातील सुसंस्कृतपणा दिसून येतो. किंवा तशी त्यांची ओळख आजही कायम आहे. भारत-अमेरिका अण्वस्त्र करार चव्हाण यांनी आतापर्यंत राज्याच्या नेतृत्त्वाबरोबरच केंद्रातील काँग्रेसच्या मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. भारत-अमेरिका अण्वस्त्र करार मंजूर करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. सीबीआयच्या महत्त्वाच्या प्रकरणांवर ते देखरेख ठेवत होते. केवळ पीएमओमध्येच नाही तर विज्ञान आणि तंत्रज्ञान, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन तसेच संसदीय कामकाज मंत्रालयाचेही ते राज्यमंत्री होते. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्त्वातच 2014 मध्ये निवडणुका 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आजपर्यंत राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री झालेला नाही. त्यामुळे आजपर्यंतच्या इतिहासात राज्यातील काँग्रेसचे अखेरचे मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव घ्यावे लागेल. 2014 मध्ये त्यांच्याच नेतृत्वात काँग्रेसने विधानसभा निवडणुका लढवली होती. मात्र, त्यानंतर आजपर्यंत महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला नाही. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी असला तरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेसला कमी महत्त्वाची मंत्रिपदे स्वीकारावी लागली होती. आता 2019 च्या निवडणुकीत नंतर काँग्रेस पक्ष पुन्हा सत्ता स्थापन करताना प्रमुख दावेदार ठरतो का? हे पाहावे लागेल. पुढील भागात देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास पृथ्वीराज चव्हाण हे स्वत:चे वर्णन करताना अभियंता, उद्योगपती, राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ता असेच करतात. आगामी निवडणुकीत पुन्हा काँग्रेसचे सरकार आले तर त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी राहील, यात शंका नाही. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या ‘दिव्य मराठी’च्या विशेष भागात आता आपण इथेच थांबूया… पुढच्या भागात पाहूयात महाराष्ट्राची दिशा आणि दशा बदणारे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास… राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा प्रवास आणि कार्याचा आढावा घेणाऱ्या आणखी बातम्या वाचा….