विरोधकांनी पाच वर्षे आराम करावा:मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसेंना टोला; धूलिवंदन सणाच्या निमित्ताने देखील राजकीय वाद समोर

आज देश भरामध्ये होळी सणाचा उत्साह दिसून येत आहे. यातच धुळवड म्हटले की, एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप देखील होत असतात. असाच काहीसा प्रकार जळगाव जिल्ह्यात देखील पाहायला मिळाला. जळगाव जिल्ह्यातील कट्टर राजकीय विरोधक असलेले एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद महाराष्ट्राला माहितीच आहे. त्यातच धुळवड निमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना टोला लगावला आहे. राज्यात विरोधक शिल्लक राहिलेले नाहीत. जे शिल्लक राहिले आहेत त्यांनी पाच वर्षे आराम करावा, असा सल्ला गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दिला आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी पोलिस आरोपींना संरक्षण देत असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. मात्र आरोपींवर कठोर कारवाई व्हायला पाहिजे, हेच आमचे पहिल्यापासून मत आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे कोणाला वाचवले जात आहे, या आरोपात काहीही तथ्य नसल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. सर्व तरुणांनी व्यसनापासून दूर राहणे गरजेचे धूलिवंदनाच्या निमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना गिरीश महाजन यांनी तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचा देखील सल्ला दिला आहे. जगात भारतात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. या तरुणांमुळे भारत सशक्त झाला पाहिजे. त्यासाठी सर्व तरुणांनी व्यसनापासून दूर राहणे गरजेचे असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर तरुणांनी नियमित व्यायाम करण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. चांगल्या सूचना असल्यास त्यांनी त्या सरकारला सुचवाव्यात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. त्यामुळे राज्यात सध्या विरोधक शिल्लक नाहीत. जे थोडेफार शिल्लक आहेत, त्यांनी पाच वर्षे आता आराम करावा. त्यांच्याकडे काही चांगल्या सूचना असल्यास त्यांनी त्या सरकारला सुचवाव्यात, असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना टोला लगावला. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील राजकीय वाद धूलिवंदनाच्या निमित्ताने देखील पाहायला मिळाला.