पुण्यात ‘ग्रेस अँड पॉवर’ पुरस्कारांचे वितरण:कथ्थक गुरु शमा भाटे यांच्या हस्ते तीन प्रतिभावंत महिलांचा सन्मान

माझ्या नृत्यकलेने मला एकाग्रता, आत्मविश्वास, कम्युनिकेशन स्किल्स व आत्मभान दिले. कथक नृत्याने मला विचार करायला, स्वप्न पहायला शिकवले. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने आपली कलात्मकता जपत व्यक्तिमत्त्व विकास साधावा असा सल्ला ज्येष्ठ कथक गुरु शमा भाटे यांनी दिला. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत श्री बालाजी विद्यापीठ, पुणे यांच्या वतीने पहिल्या ‘ग्रेस अँड पॉवर’ पुरस्कारांचे वितरण गुरु शमा भाटे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. इंटरनॅशनल चेंबर ऑफ मेडिकल टुरिझमच्या संचालिका डॉ प्रचीती पुंडे, आर्मीच्या आर्टिलरी विभागातील मेजर मॉलश्री अगरवाल या देखील प्रमुख पाहुण्या म्हणून व्यासपीठावर उपस्थित होत्या. श्री बालाजी विद्यापीठ, पुणेच्या ताथवडे येथील कॅम्पसमधील सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात एला फाउंडेशनच्या सह-संस्थापिका, एथनो ओर्निथोलोजी (पक्षीशास्त्र) या विषयाच्या अभ्यासक व तज्ज्ञ असलेल्या डॉ सुरुची पांडे, आर्ट टुडे व राजा रवि वर्मा कला दालनाच्या माध्यमातून व्हिज्युअल आर्ट अर्थात दृश्य-कला क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रियंवदा पवार आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या टेनिसपटू ऋतुजा भोसले यांना ‘ग्रेस अँड पॉवर अवॉर्ड’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एसबीपीयुचे कुलगुरू डॉ. गंगाधर शिरुडे, कुलसचिव डॉ. एस. बी. आगसे, स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स च्या प्राचार्या डॉ. प्रीती जोशी, बालाजी इन्स्टिट्यूट ऑफ मॉडर्न मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ. अर्चना श्रीवास्तव, डॉ. विनिता देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. शमा भाटे म्हणाल्या, कला तुम्हाला विचार करायला आणि स्वप्न पाहायला शिकवते. माझ्या कलेद्वारे मला अनेक गोष्टी गवसल्या. त्यामुळे मी एक नृत्यांगना, एक कलाकार असल्याचा मला अभिमान आहे. कलेतून मिळणारी उर्जा अनेक अर्थाने उपयोगी पडते असे मला वाटते. डॉ प्रचीती पुंडे यांनी बाहेरील सौंदर्यापेक्षा माईंडफुल अवेअरनेस आणि वेलनेसचे महत्त्व उपस्थितांसमोर विशद केले तर मॉलश्री यांनी आर्मी ही तुम्हाला नोकरी नव्हे तर एक ‘करियर’ देते असे सांगत आर्मीमध्ये भरती होण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टींबद्दल माहिती दिली. यावेळी बोलताना डॉ. पांडे यांनी मानवी ऋणांबद्दल सांगताना देवऋण, ऋषीऋण, पितृऋण, भूत ऋण आणि मनुष्यऋण यांबद्दल माहिती दिली. भूतऋण अर्थात निसर्गातील प्राणी पक्षी यांबद्दल ऋणी राहणे, त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे असेही त्या म्हणाल्या. कलात्मक प्रवास हा आजूबाजूच्या समाजाला जोडणारा, खूप काही शिकविणारा असा प्रवास असल्याचे प्रियंवदा पवार यांनी नमूद केले.