पुणे गॅलरीत ‘चित्रध्वनी’ प्रदर्शनाचे आयोजन:50 कलाकृती, जुनी पोस्टर्स आणि रेकॉर्ड लेबल्सचे तीन महिने चालणारे विनामूल्य प्रदर्शन

कलेची अभिव्यक्ती हा एक निश्तित स्फुरलेला विचार मांडण्याचा प्रयोग असतो. संगीतातही आणि चित्रकलेतही. तो कधीच अपघात नसतो. चित्राच्या निर्मितीमध्ये त्या चित्रकाराचे व्यक्तिमत्व दिसते. त्याची चित्रे पाहताना चित्रकाराच्या मनोभूमिकेबद्दल अंदाज बांधता येतो. तसेच कलेचा अनुभव अतिशय वैयक्तिक आणि पाहणाऱ्याच्या भावनाविश्वाशी जोडलेला असतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रकार जयंत जोशी यांनी केले. महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या पुणे गॅलरी ऑफ व्हिज्युअल आर्टच्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित ‘चित्रध्वनी’ या दृक श्राव्य प्रदर्शनाचे उद्घाटन जयंत जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. नितीन हडप, पीजीव्हीएचे समन्वयक प्रमोद काळे, विक्रम मराठे, चैतन्य कुंटे, सचिन निंबाळकर हे देखील यावेळी उपस्थित होते. टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकात असलेल्या ज्योत्स्ना भोळे सभागृह, श्रीराम लागू रंग अवकाश या ठिकाणी पुढील तीन महिने ‘चित्रध्वनी’ हे प्रदर्शन रसिकांसाठी सकाळी ११ ते सायं ८ या वेळेत विनामूल्य खुले असणार आहे. या प्रदर्शनामध्ये चित्रकार सुधीर पटवर्धन, आरती किर्लोस्कर, राजू बाविस्कर, चंद्रमोहन कुलकर्णी यांसारख्या अनेक कलाकारांच्या सुमारे ५० कलाकृती, काही जुन्या रेकॉर्ड्सचे लेबल्स, चित्रपटांची जुनी पोस्टर्स देखील उपस्थितांना पाहता येतील. जयंत जोशी म्हणाले,ध्वनी-नाद-संगीत आणि दृश्य… पाहणे आणि ऐकणे. एखादी कल्पना स्फुरते, घटना घडते आणि प्रत्येक माणसाला त्या घटनेचे आकलन कसे होते याचे परिमाण ठरवण्यासाठी मोठी प्रश्नावली तयार करावी लागेल. ज्याच्या-त्याच्या क्षमतेनुसार जो तो घटनेचा अन्वयार्थ लावतो. कलावंताच्या बाबतीतही हीच प्रक्रिया घडते आणि निर्मितीचे निमित्त ठरते. दृश्य कलाक्षेत्रातल्या मोठ्या मोठ्या कलावंतानी आपल्या कलाकृतींमध्ये संगीत भिनवण्याचा नेहमीच प्रयत्न केला. कधी तो चित्रातील लय सांभाळताना तर कधी सुरांच्या अचूकतेशी सांगड घालताना दिसतात. परमेश्वर आहे याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे संगीताचे आस्तित्व! जगणे त्यामुळे सुसह्य होते. माझे स्वतःचे भरणपोषण संगीतामुळे झाले – मानसिक आणि व्यावहारिकसुद्धा. माझ्या वडिलांनी आयुष्यात फक्त गाणेच केले. अनेक मोठे चित्रकार, शिल्पकार, कवी, लेखक आमच्या घरी लहानपणापासून येत असत. गाण्याबरोबरच मी दृश्य कलेच्याही प्रेमात पडलो. परंतु माझे पहिले प्रेम संगीतच आहे, असे ते पुढे म्हणाले. प्रमोद काळे म्हणाले, मानवी अवकाश हा असंख्य ध्वनींनी सतत दुमदुमलेला असतो. यात संगीतासारखे सुमधुर, निसर्गातील अनंत ध्वनी आणि कोलाहलासारखे कर्कश असे असंख्य नाद असतात. तसेच या अवकाशात असंख्य रेषा आणि आकारही असतात. चित्र-शिल्प अशा दृश्य कलाकृतींमध्ये कित्येकदा विविध नादही ‘ऐकू’ येतात, हाच अनुभव रसिकांना देण्याच्या उद्देशाने निवडक अशा दृश्य कलाकृतींचे दृक्-श्राव्य प्रदर्शन आहे.

Share

-