पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी मोठी घोषणा:1299 कोटींच्या विकास आराखड्यासह पर्यटन विकास योजनेला मंजुरी

पुणे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. विधानभवनात झालेल्या या बैठकीत एकूण १ हजार २९९ कोटी ५८ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यासह ७५३ कोटी रुपयांच्या अतिरिक्त मागणीला मान्यता देण्यात आली. या आराखड्यात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत १०९१ कोटी ४५ लाख रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १४५ कोटी रुपये आणि आदिवासी उपयोजनेसाठी ६३ कोटी १३ लाख रुपयांचा समावेश आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी एक एकात्मिक आराखडा तयार करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. बैठकीला तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक खासदार, आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळे, धार्मिक स्थळे, गड-किल्ले आणि स्मारकांच्या संवर्धनासाठी विशेष लक्ष देण्यात येणार असून, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीसोबतच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) आणि राज्य पर्यटन विभागाकडून अतिरिक्त निधी मिळवण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

Share

-