झटपट पैसे कमावण्याच्या उद्देशाने माजी नगरसेवकाकडे 50 लाख रुपयांची खंडणी:व्हाॅट्सअपवर व्हिडिओ कॉल; चौघांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश

बदलापूर येथील माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांना धमकी देत त्यांच्याकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शैलेश वडनेरे यांनी बदलापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. झटपट पैसे कमावण्याच्या उद्देशाने बदलापूर मधील चार आरोपींनी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बदलापूर मधील माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांना महिना भरापूर्वी एका अज्ञात नंबर वरून व्हाॅट्सअप वर व्हिडिओ कॉल आला होता. या व्हिडिओ कॉल मध्ये शैलेश वडनेरे यांच्या अश्लील फोटो होते. तसेच हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देतो त्यांच्याकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. मात्र सुरुवातीला वाडनेरे यांनी याकडे लक्ष दिले नाही. त्यांना हा खेडसाळपणा वाटला. मात्र वारंवार खंडणीची मागणी केली गेल्यानंतर त्यांनी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात याबाबत अधिकृत तक्रार दाखल केली. सदरील तक्रारीनंतर पोलिसांनी देखील तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. त्यानंतर समोर आलेल्या पुराव्यानुसार चार आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये अक्षय जाधव, रोहित आडारकर, दीपक वाघमारे आणि पुष्कर कदम यांचा समावेश आहे. या चौघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना 15 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास सुरू आहे. विशेष म्हणजे या चार आरोपींपैकी अक्षय जाधव आणि दीपक वाघमारे या दोघांवर यापूर्वी देखील अंबरनाथ मधील एका डॉक्टरच्या घरावर कोट्यावधी रुपयांचा दरोडा टाकल्याचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी त्यांना कैद देखील झाली होती. या गुन्ह्यातून जामिनावर सुटल्यानंतर झटपट पैसे कमावण्याच्या उद्देशाने त्यांनी माजी नगरसेवक शैलेश वाडनेरे यांना खंडणीची मागणी केली. मात्र पोलिसात तक्रार दाखल केल्यामुळे त्यांचा हा डाव यशस्वी होऊ शकला नाही.