महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे महायुतीत?:जिथे शक्य असेल, तिथे त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करू, फडणवीसांचे सूतोवाच

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीत त्यांनी मनसैनिकांना महायुती विरोधात रिंगणात उतरवले होते. राज ठाकरे विधानसभेला महायुती विरोधात का लढले? याचे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. आम्ही तीन पक्ष होतो आमच्याकडे त्यांना देण्यासाठी जागाच नव्हत्या. त्यामुळे ते विरोधात लढले, असे फडणवीस म्हणाले. तसेच महापालिकेच्या निवडणुकीत शक्य असेल, तिथे त्यांना सोबत घेता आले, तर आम्ही प्रयत्न करू, असेही ते म्हणाले. महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे गटाने कंबर कसली असून, उद्धव ठाकरेंनी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हळूहळू पक्षांनी चाचपणी करण्यास सुरुवात झाल्याचे चित्र आहे. त्यातच देवेंद्र फडणवीसांच्या या विधानामुळे आता विधानसभा निवडणुकांप्रमाणेच मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या महायुतीत जाण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
राज ठाकरे यांनी लोकसभेत आम्हाला खुलेपणाने पाठिंबा दिला. आम्हाला त्याचा फायदा झाला. विधानसभेत आमच्या हे लक्षात आले की, त्यांच्यासमोर महाराष्ट्रात त्यांचा पक्ष आहे. त्यांच्या लोकांनी निवडणुकाच लढल्या नाहीत, तर तो पक्ष चालेल कसा? आमच्याकडे त्यांना देण्यासाठी जागाच नव्हत्या. आम्ही तीन पक्ष होतो. ही वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा निर्णय घेतल्याचे फडणवीसांनी सह्याद्री वाहिनील दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितले. त्यांचे आणि आमचे विचार मोठ्या प्रमाणावर एकसारखे
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे महायुतीसोबत येतील असे, सूतोवाच केले. राज ठाकरे इतक्या मोठ्या प्रवाहाच्या विरोधात लढले. पण त्यांना चांगली मते मिळाली आहेत. त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिशय चांगली मते घेतली आहेत. मला वाटते की, त्यांचे आणि आमचे विचार मोठ्या प्रमाणावर एकसारखे आहेत. त्यांना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला नक्कीच रस आहे. आनंद आहे. महापालिकेच्या निवडणुकीत जिथे शक्य असेल, तिथे त्यांना सोबत घेता आले, तर आम्ही प्रयत्न करू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. निवडणुकीत मनसेचे सर्व उमेदवार पराभूत
राज ठाकरे यांनी यंदाची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढली होती. त्यांनी 128 मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. परंतु, त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यासह त्यांचा एकमेव आमदार असलेले राजू पाटील, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश जाधव, गजानन काळे यांच्यासह सर्व उमेदवारांचा या निवडणुकीत पराभव झाला. असे असले तरी त्यांच्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मते मिळवल्याचे पाहायला मिळाले.

Share

-