राज ठाकरेंना माहीममध्ये धक्का:अमित ठाकरेंचा माहीम मतदारसंघात पराभव, बच्चू कडू, बाळासाहेब थोरात, ऋतुराज पाटीलांचा पराभव
माहीम विधानसभा मतदारसंघातून राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा पराभव झाला आहे. ठाकरे गटाचे महेश सावंत विजयी झाले आहेत. अमित ठाकरे हे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. तर विद्यमान आमदार सदा सरवणकर हे दुसऱ्सा क्रमांकावर असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान तिकडे विदर्भात आमदार बच्चू कडू यांचा अचलपूर विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्रूा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार प्रविण तायडे विजयी झाले आहेत. आम्ही सरकार स्थापन करू. यामध्ये काही अपक्ष असतील आणि काही लहान पक्षांचा समावेश असेल असे दोन दिवसांपूर्वी कडू यांनी म्हटले होते. सतेज पाटलांना धक्का कोल्हापुरातील प्रतिष्ठेची मानली गेलेली कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विद्यमान आमदार अन् सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांचा पराभव झाला आहे. भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी त्यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. ऋतुराज पाटील यांचा पराभव हा सतेज पाटलांना मोठा धक्का मानला जात आहे. थोरात यांचा पराभव काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांना धक्का बसला आहे. नवव्या वेळेस संगमनेर विधानसभेत निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या बाळासाहेब थोरातांचा एका नवख्या उमेदवाराने दारूण पराभव केला आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढवणारा अमोल खताळ यावेळी जायंट किलर ठरले आहेत.