राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागायला हवा:संजय राऊतांची खोचक टीका; तर नगर विकास खात्यावरुन शिंदेना इशारा

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागायला हवा, अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खोचक टीका केली आहे. राज ठाकरे यांना ईव्हीएम घोटाळ्या संदर्भात काही प्रश्न असतील तर त्यांनी ते मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारायला हवेत. तसेच त्या दोघातील हा संवाद सर्वसामान्य जनतेसमोर लाईव्ह करायला हवा. त्यामुळे सामान्य व्यक्तीच्या मनातील असलेली अनेक जाळमटे दूर होतील, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील राऊत यांनी टीका केली. एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यासंदर्भात लवकरच काही प्रकरणे आपण समोर आणणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे मित्र आहेत. राज ठाकरे हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे समर्थक आहेत. आमच्या दृष्टिकोनात अमित शहा, नरेंद्र मोदी, फडणवीस यांची महाराष्ट्र संदर्भातली भूमिका ही चांगली नाही. अशा लोकांचे राज ठाकरे राजकीय मित्र आहेत. ते एकमेकांना मदत करतात. आता भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत गोटातील या मित्राने ईव्हीएमचा घोटाळा, ईव्हीएममध्ये पडलेली मते कुठेतरी गायब झाली, त्याच्यामुळे हे सरकार सत्तेवर आले आहे. थोडक्यात हा घोटाळा आहे आणि राज ठाकरे यांनी त्यांच्या मनातील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत. ते प्रश्न घेऊन त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घ्यायला हवी आणि फडणवीस काय उत्तर देतील हा संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. हा दोघांमधील संवाद लाईव्ह दाखवायला पाहिजे, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागायला हवा राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसमोर जे प्रश्न विचारले, ते त्यांनी वारंवार विचारायला हवे. कारण ते सर्वांना पडलेले प्रश्न आहेत. फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे पक्ष जिंकले कसे? हा प्रश्न तर त्यांना स्वत:ला देखील पडला आहे. त्यामुळे शिंदे, फडणवीस आणि पवार दररोज दहा मिनिटे एकमेकांना भेटतात आणि चिमटे काढून पाहतात की, खरेच आपण जिंकलो आहोत का? याची खातर जमा करतात, अशा शब्दात राऊत यांनी निशाणा साधला आहे. ईव्हीएम घोटाळ्यातून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद मिळाला आहे. असे राज ठाकरे म्हणत असतील तर त्या त्यांनी पण मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागायला हवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Share