राज ठाकरेंनी हिंदू भाविकांचा अपमान केला:त्यांनी कुंभला जाऊन जाहीर माफी मागितली पाहिजे, ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची टीका

राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 19 व्या वर्धापन मेळाव्यात बोलताना महाकुंभाविषयी भाष्य केले होते. यावेळी त्यांनी महाकुंभमधील पवित्र स्नानाची खिल्ली उडवली होती. यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. यात आता ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनीही राज ठाकरेंवर निशाणा साधला. राज ठाकरे यांनी केलेल्या विधानाकरिता त्यांनी कुंभला जाऊन जाहीर माफी मागितली पाहिजे, असे सदावर्ते म्हणाले. शिवाय राज ठाकरेंनी परप्रांतीय फेरीवाल्यांवर निशाणा साधणे थांबवायला हवे, नाहीतर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे. प्रयागराज येथे महाकुंभमेळा पार पडला. कुंभ हा केवळ श्रद्धेचा उत्सव नाही तर तो जीवनातील चार महत्त्वाच्या सत्यांचा – धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष – एक जिवंत संगम आहे. 45 दिवस हा महाकार्यक्रम चालला. या 45 दिवसांच्या कुंभमेळ्यात सुमोर 65 कोटी लोकांना पवित्र स्नान केले. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याच पवित्र स्नानाची खिल्ली उडवली. राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा हिंदू समाजातील लोकांकडून निषेध करण्यात येत आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर हल्ला चढवला आहे. राज ठाकरेंनी हिंदू भाविकांचा अपमान केला राज ठाकरे यांनी महाकुंभाविषयी बोलताना बाळा नांदगावकर यांचा अपमान तर केलाच आहे, सोबत अशाप्रकारचे वक्तव्य करुन त्यांनी तमाम स्त्रिया आणि हिंदू भाविकांचाही अपमान केला आहे. या विधानाकरिता राज ठाकरे यांनी कुंभला जाऊन जाहीर माफी मागितली पाहिजे. अशी टीका ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली. यावेळी सदावर्ते यांनी राज ठाकरेंची परप्रांतीय नागरिकांबाबत असलेल्या भूमिकेवरून त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. राज ठाकरे नेहमी फेरीवाले आणि कष्ट करणाऱ्या लोकांना परप्रांतीय म्हणून निषाणा साधतात. असे करणे त्यांनी थांबवायला हवे. नाहीतर येणाऱ्या काळात त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी दिला. जितेंद्र आव्हाडांकडून राज ठाकरेंचे समर्थन राज ठाकरेंनी महाकुंभाविषयी केलेल्या विधानाबद्दल भाजप नेते नितेश राणे यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे. प्रयागराजला जाऊन मी आणि माझ्या आईने स्नान केले, आम्हाला कसलाच त्रास जाणवला नाही. आमच्या आस्थेबाबत त्यांनी बोलू नये. असे ते म्हणाले. तर दुसरीकडे, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंच्या विधानाचे समर्थन केले आहे. त्यांच्या डेअरींगला सलाम आहे, त्यांनी जे वक्तव्य केले त्याबद्दल त्यांना मानाचा मुजरा असे आव्हाड म्हणाले. काय म्हणाले होते राज ठाकरे? नुकतीच कोरोना महामारी होऊन गेली आहे. दोन वर्ष तोंडाला कापड लावून आपण फिरलो आणि तिकडे जाऊन कुंभमेळ्यात अंघोळ करत आहोत. कुणालाही कुणाचे देणेघेणे नाही. श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले, या देशातील एक नदी स्वच्छ नाही. परदेशातील नद्या एकदम स्वच्छ असतात. आपण आपल्या इथे नद्यांना माता म्हणतो मात्र परदेशात असे होत नाही. तरीही त्या नद्या स्वच्छ आहेत. मात्र आपल्या इथल्या नद्यांमध्ये सर्व प्रदूषित पाणी सोडले जाते. राजीव गांधी असल्यापासून गंगा स्वच्छ होणार हे ऐकत आहे. पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही. या सगळ्या श्रद्धा, अंधश्रद्धेतून बाहेर पडा. आपली डोकी नीट हलवा, असे राज ठाकरे म्हणाले होते.

Share

-