रक्षा खडसेंच्या मुलीची छेड प्रकरण:यामध्ये एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी, त्यांच्यावर कडक कारवाई होईल – CM फडणवीस

केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आला. मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील जत्रेत सुरक्षारक्षक सोबत असताना रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढण्यात आली. तसेच व्हिडिओ देखील काढला होता. याप्रकरणी रक्षा खडके मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. यावेळी आक्रमक पवित्रा घेत त्यांनी आरोपींच्या अटकेच्या मागणी केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेमध्ये एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर एका आरोपीला ताब्यात घेतल्याने पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मात्र, या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका केंद्रीय मंत्र्यांची मुलगी सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य मुलींचे काय? असा प्रश्न या घटनेवरून उपस्थित होत आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
यावर बोलताना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेमध्ये दुर्दैवाने एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी असल्याची सांगितले. या लोकांनी अतिशट वाईट प्रकारचे काम केलेले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल आहे. काहींना अटक केलेली आहे. इतरांनाही अटक केली जाईल. अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी छेडखानी करणे आणि त्रास देणे अतिशय चुकीचे आहे. कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना माफी देता कामा नये. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई होईल, असे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त केले. तरुणांविरुद्ध पोलिसांकडे आधीच अनेक तक्रारी – एकनाथ खडसे
रक्षा खडसे यांचे सासरे आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी छेड काढणाऱ्या तरुणांना राजकीय संरक्षण असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, ‘ पोलिस ठाण्यात गेल्यावर आम्हाला दोन तास बसवून ठेवण्यात आले. ही बाब मुलींशी संबंधित असल्यामुळे पोलिसांनी आम्हाला या प्रकरणाचा पुनर्विचार करण्यास सांगितले. तरुणांनी पोलिसांना मारहाण केली. कल्पना करा की, ते कोणत्या हद्दीपर्यंत जाऊ शकतात. या तरुणांविरुद्ध पोलिसांना आधीच अनेक तक्रारी आल्या आहेत. ही मुले क्रूर गुन्हेगार आहेत. महाराष्ट्रात महिलांवरील गुन्हे वाढले आहेत. गुन्हेगारांना पोलिसांची भीती वाटत नाही. मी या संदर्भात डीएसपी आणि आयजीशी बोललो आहे. नेमके प्रकरण काय?
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे महाशिवरात्री निमित्त मोठी जत्रा भरते. रक्षा खडसे यांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणी सुरक्षारक्षकांसोबत या जत्रेमध्ये गेली होती. यावेळी काही टवाळखोर तरुण त्यांचे परिवाराचे चित्रण करत असल्याचा संशय आला. या संशयावरून त्यांनी या तरुणाच्या हातामधील मोबाईल घेऊन त्याची पडताळणी केली. या घटनेचा राग येऊन चारही टवाळखोरांनी सुरक्षा रक्षकासोबत झटापट केली. सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की, मुलींचीही छेड काढली
याबाबत रक्षा खडसे यांनी सविस्तर माहिती दिली. त्या म्हणाल्या, महाशिवरात्रीच्या निमित्ताने संत मुक्ताबाईंची यात्रा असते. त्या यात्रेनिमित्त अनेक लोक सहभागी होत असतात. परवा रात्री मी गुजरातला होते. आज सकाळीच मी येथे आले. परवा माझ्या मुलींचा फोन आला, त्यांनी मला यात्रेत जायचे असे सांगितले. मी त्यांना सांगितले की सुरक्षारक्षकाला सोबत घेऊन जा. तसेच तुझ्या मैत्रिणी आणि ऑफिसमधील दोन तीन लोकांना सोबत घेऊन जा. कारण दरवर्षी गर्दी असते. धक्काबुक्की होते. त्यामुळे थोडी सुरक्षा असायला हवी. पण तिथे गेल्यानंतर काही टवाळखोर मुलांनी त्यांचा पाठलाग केला. त्यांच्या पाळण्यात शेजारी जाऊन बसले. आमच्या सुरक्षारक्षकाने त्यांना दुसऱ्या पाळण्यात बसवले, तर तिथेही ही टवाळखोर मुले त्यांना त्रास द्यायला लागले. तसेच सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की केली. मुलींचीही छेड काढली. सत्ता कोणाचीही असो, शेवटी प्रशासनाकडे जेव्हा तक्रार येतात, तेव्हा गंभीर कारवाई झाली पाहिजे. माझ्या मुलींसोबत पोलिसांच्या ड्रेसमधील माणूस असताना त्यांच्यासोबत हा प्रकार घडत असेल तर हे फार गंभीर आहे. मी मुख्यमंत्र्यांशी दोन वेळा बोलली, त्यांनीही सूचना दिली आहे, अशी माहिती रक्षा खडसेंनी माहिती दिली.

Share

-