बलात्कार करणाऱ्या नराधमांना नपुंसक करा:राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची मागणी; छेड काढणाऱ्यांना चोप देण्याचाही सल्ला

महिलांच्याबाबतीत घडणाऱ्या अशा घटना कमी करायच्या असतील तर मनातच भीती निर्माण करायला हवी. यासाठी महिलांची छेड काढणाऱ्यांना थेट चोप आणि बलात्कार करणाऱ्या नराधमांना नपुंसक केलं पाहिजे, असे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी म्हटले आहे. राज्यात महिला अत्याचाराच्या घटना चिंतेचा विषय बनल्या आहेत, याप्रकरणी राज्यपाल बागडे यांनी हे वक्तव्य केले आहे. राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले की, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य होते, तेव्हा गावचा एका पाटील होता. त्याने एका तरूणीवर बलात्कार केला. ते दुष्कृत्य समोर येताच शिवाजी महाराजांनी थेट आदेश दिला. अत्याचार करणाऱ्याला जीवे मारू नका, त्याचे हात-पाय तिथल्या तिथे तोडा, असे शिवाजी महाराजांनी सांगितले होते. मरेपर्यंत तो (पाटील) तशाच अवस्थेत राहिला. सोमवारी बलात्काराच्या वाढत्या घटनांबाबत बोलताना भरतपूर जिल्हा बार असोसिएशनच्या शपथविधी समारंभात व्यासपीठावरून राज्यपालांनी हे वक्तव्य केले आहे चोप देत नाही तोपर्यंत आळा बसणार नाही हरिभाऊ बागडे म्हणाले की, काही लोक महिलांवर अत्याचार होत असतानाही व्हिडिओ बनवत असतात. जे योग्य नाही. आपल्या समोर अशी घटना होत असले तर त्याला पकडा. एकटे आहात म्हणून मागे हटू नका. समोर या आणखी 2-4 लोक मदतीला येतील. जोपर्यंत विनयभंग करणाऱ्याला आपण चोप देत नाही तोपर्यंत अशा गुन्ह्यांना आळा बसणार नाही. फाशीची तरतूद असताना घटना थांबत नाही हरिभाऊ बागडे म्हणाले की, नराधमांमध्ये धाक निर्माण करायचा असेल तर कायद्याच्या भीतीसाठी काय करावे, याचा आता तुम्हीच विचार करा. गुन्हेगारांना कायद्याचा धाक नसल्याचे अशा घटना घडत आहेत. सध्या आपल्या देशात 12 वर्षांखालील मुलीवर लैंगिक अत्याचार किंवा विनयभंग केला तर फाशीची तरतूद आहे. पण तरीही अशा घटना थांबत नाहीत.