बिनकामाचे मंत्री मंत्रिमंडळात अन् कामाचा बाहेर:छगन भुजबळ यांच्यासोबत बैठकीनंतर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले नसल्याने त्यांच्यासह ओबीसी नेते देखील नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आज ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळ यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेत चर्चा केली. या चर्चेनंतर ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे बिनकामाचे आहेत त्यांना आत घेतले माध्यमांशी बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले, या सरकारमध्ये ओबीसींची संख्या जास्त आहे त्यामुळे हे सरकार ओबीसींचे सरकार म्हणायला हरकत नाही, अशी भूमिका जि सरकार मांडत आहे. पण हे सगळे जरी खरे असले तरी हा सगळा गाव आमच्या मामाचा आहे, त्यातला एक तरी कामाचा पाहिजे न. जो कामाचा आहे त्याला बाहेर काढले आणि जे बिनकामाचे आहेत त्यांना आत घेतले, अशी टीका त्यांनी केली आहे. 33 हजार ओबीसींच्या राजकीय जागा गायब केल्या पुढे बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले, या 17 लोकांना आव्हान आहे त्यांनी आवाज उठवावा ओबीसींचा आणि जात जनगणनेचा प्रश्न सरकारकडे मांडून तो मंजुर करून घ्यावा. 33 हजार याठिकाणी ओबीसींच्या राजकीय जागा गायब केल्या आहेत. त्यावर भाटीया कमिशनच्या माध्यमातून डल्ला मारण्यात आलेला आहे. या जागा परत आणण्यासाठी हे मंत्री काय करतात हेच आम्ही बघणार आहोत. आजच्या बैठकीत देखील आमचा निर्णय झालेला आहे की जोपर्यंत आमच्या 33 हजार जागा पुन:स्थापित होत नाहीत, भाटीया कमिशनचा अहवाल रद्द होत नाही, कारण त्यांनी ओबीसींची 37 टक्के संख्या सांगितली आहे. हा मोठा अन्याय आहे. त्यामुळे या सरकारने कुठल्याही परिस्थितीत स्थानिक निवडणुका घेऊ नयेत. आम्ही भुजबळांच्या पाठीशी ठामपणे उभे छगन भुजबळ यांच्या विषयी बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले, आम्ही भुजबळ साहेबांना म्हणालो आपण आमचे नेते आहात. आपला जो लढा आहे तो तुम्ही लढलात. जरांगे यांचे इतके मोठे वादळ या महाराष्ट्रात निर्माण झाले होते ते वादळ समर्थपणे हातळण्याचे काम हे आमच्या या नेतृत्वाने केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम भटके विमुक्त असतील, ओबीसी असतील सगळ्या संघटनेच्या नेत्यांनी एकमताने ठाम निर्णय घेतला आहे की भुजबळ मंत्रिमंडळात असोत किंवा नसोत आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असणार आहोत. ओबीसींचे आंदोलन सुरू करणार पुढे बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले, थोड्याच दिवसात आम्ही रस्त्यावरची लढाई देखील सुरू करणार आहोत. 24 तारखेला जरांगे यांचे आंदोलन सुरू होत आहे. त्याच्या समग त्याच्या तोडीसतोड ओबीसींचे आंदोलन देखील त्याठिकाणी सुरू होणार आहे. या सगळ्या लढ्याचे नेतृत्व भुजबळ साहेब केल्याशिवाय राहणार नाहीत. आमच्या आरक्षणाचे संरक्षण आम्हाला करावे लागणार आहे. हे जरी ओबीसीचे सरकार आले असले तरी देखील हे ओबीसीच्या आरक्षणाचे संरक्षण करू शकेल का यावर आम्हाला विश्वास नाही. शेर कभी बुढा नाही होता उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की नवीन लोकांना संधी देण्यासाठी काही आमदारांना मंत्रिपद दिले नाही. त्यामुळे जे नाराज आहेत त्यांनी समजून घेतले पाहिजे, या विधानावर बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले, हे बघा शेर कभी बुढा नाही होता. हा (छगन भुजबळ) ओबीसीचा शेर आहे, हा कधी म्हातारा होत नाही. त्यामुळे तरुणांने म्हातारे होण्याची व्याख्या जी आहे ती छगन भुजबळ यांना लागू होत नाही. त्यामुळे आमची विनंती आहे की अजितदादांनी पुन्हा एकदा विचार करावा.