सत्तेपेक्षा साधना महान:संजय महाराज यांचे काल्याचे कीर्तन रंगले; बिडकीन येथील राज्यस्तरीय गाथा पारायण सप्ताहाची सांगता

भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते, महाराष्ट्राचे पहिले कृषिमंत्री कोण होते, सांगा याचे उत्तर. सांगा…नाही ना आठवत. मात्र, जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठगमनास 375 वर्षे झाली. तरीही त्यांची आम्हाला आठवण येते. कारण सत्तेपेक्षा साधना कधीही महान असते, असे सांगत संजय महाराज पाचपोर यांच्या काल्याच्या कीर्तनाने भाविकांना दंग केले. बिडकीन येथील राज्यस्तरीय गाथा पारायण सप्ताह आणि प्रसिद्ध रामायणाचार्य रामरावजी ढोक यांच्या रामकथा सप्ताहाची सांगता झाली. या कार्यक्रमाला भाविकांनी उदंड गर्दी केली. गाथा पारायण सप्ताह आणइ संगीत राम कथा व सप्ताहाचे आयोजन एकनाथ महाराज यांनी बिडकीन ग्रामस्थांच्या सहकार्याने केले होते. यासाठी 80 x 250 असा भव्य मंडप उभारण्यात आला. या पारायणाचा शुभारंभ खासदार संदीपान भुमरे यांनी गाथा पूजनाने केला. सकाळी गाथा पारायण, दुपारी राम कथा, सायंकाळी हरिपाठ नंतर रात्री कीर्तनाचे आयोजन अशी भक्तीरसाची पर्वणी येथे भाविकांना अनुभवायला मिळाला. अनेकांनी हा भव्य मंडप भरेल की नाही, अशी शंका व्यक्त केली. मात्र, सकाळपासूनच भाविकांनी सरस्वती भवन विद्यालयाच्या प्रांगणामधील या कार्यक्रमाला तोबा गर्दी केली. भक्तीसोहळ्यात पहिले कीर्तन तुकाराम महाराजांचे वंशज पुंडलिक महाराज यांनी केले. ते म्हणाले, सद्य परिस्थितीमध्ये भाविक देहूकडे येतात. मात्र सध्या देहूमध्ये जे वातावरण आहे ते वातावरण मला बिडकीन येथे अनुभवास येत आहे. सोहळ्यामध्ये दुसरे कीर्तन एकनाथ महाराजांचे वंशज योगीराज महाराज गोसावी यांचे झाले. त्यांनी संत एकनाथ महाराज तुकाराम महाराजांच्या जवळिकीवर भाष्य केले. संत एकनाथ महाराजांनी महाराष्ट्रासाठी मोठे कार्य केले. पांडुरंगाची मूर्ती कर्नाटकमधील राजाने नेली. मात्र, नाथवंशज भानुदास महाराज यांनी ती महाराष्ट्रात आणली व प्रतिष्ठापना केल्याची आठवण सांगितली. रामराव महाराज ढोक यांची रामकथा रंगली. त्यांनी मंडपातील भव्य उपस्थितीचे कौतुक केले. येथे तिसऱ्यांदा रामकथा होत असूनही बिडकीनकरांचे प्रेम व भक्तीभाव कमी होत नाही. त्यामुळे मंडपात जागा नसल्याचे म्हणत त्यांनी भाविकांचे कौतुक केले. प्रमाणानुसार 8000 लोक या मंडपामध्ये बसू शकतात. स्टेज व्यवस्था वगळता मंडपामध्ये 6000 च्या जवळपास लोक बसू शकतात, असे प्रकाश मंडपचे कारभारी सोनवणे यांनी सांगितले. एकनाथ महाराज, बिडकीन येथील उद्योजक संजय दौंडे, सरपंच अशोक धर्मे, शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख मनोज पेरे, शिवसेना जिल्हा युवाप्रमुख काकासाहेब टेके व ग्रामस्थांनी या भव्य सोहळ्याचे आयोजन केले होते. याचेही मान्यवरांनी कौतुक केले.