सज्जन जगणार नाही, दुर्जन मरणार नाही:जयंत पाटलांचे विधानसभेत कविता वाचन, सरकारला टोले लगावत काढले चिमटे

अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. आज अधिवेशनात अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी कवितेच्या माध्यमातून सरकारला टोला लगावत चिमटे काढले. जयंत पाटील म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी अकरावा अर्थसंकल्प मांडला, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. पण या अर्थसंकल्पाचे वर्णन दुर्दैवाने मला बडा घर पोकळ वासा, असे करावे लागत असल्याचे जयंत पाटील म्हणाले. या सरकारच्या पाठीमागे 232 आमदारांचे बहुमत आहे. ज्यांनी बहुमत दिले, ती महाराष्ट्रातील जनता मोठ्या आशेने अर्थसंकल्पाकडे पाहत होते. पण त्यांच्या पदरी निराशा आली. अजितदादांनी अर्थसंकल्प मांडताना महाराष्ट्र आता थांबणार नाही, ही कविता केली. मग, मीही विचार करायला लागलो की कविता काही सुचतेय का बघावे. मी काही कविच्या मार्गावरचा नाहीये. पण, तरी चार ओळी सुचल्या आहेत, असे म्हणत जयंत पाटलांनी कविता वाचून दाखवली. सज्जन आता जगणार नाही
दुर्जन आता मरणार नाही
महाराष्ट्र आता थांबणार नाही गुन्हेगारी थांबणार नाही
रक्तपात रोखणार नाही
महाराष्ट्र आता थांबणार नाही पक्षफोडी करून आम्ही दमणार नाही
जनतेच्या सेवेत आम्ही रमणार नाही
महाराष्ट्र आता थांबणार नाही आश्वासने पूर्ण करणार नाही
विकासाची वाट धरणार नाही
महाराष्ट्र आता थांबणार नाही रोजगार देणार नाही
शिक्षण व आरोग्याची सेवा सुधारणार नाही
महाराष्ट्र आता थांबणार नाही जयंत पाटील म्हणाले, अर्थसंकल्प मांडताना अजितदादांनी अनेक महापुरुषांचा उल्लेख केला. त्यांना मीही वंदन करतो. पण दादांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा उल्लेख केला. अहिल्यादेवींनी धार्मिक स्थळांना आणि शेतकऱ्यांना भरभरून मदत केली. त्यांच्या नावाचा उल्लेख दादांनी केला म्हणून हा प्रश्न आहे की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पाने काय दिले. अहिल्यादेवी होळकरांच्या खजिन्यामध्ये पेशव्यांना कर्ज देण्याची ताकद होती. महाराष्ट्राच्या खजिन्याची आज काय अवस्था आहे. आज आपण महापलिकांनाही कर्ज देऊ शकत नाही, अशी आपली परिस्थिती आहे. कारण आपणच मोठ्या प्रमाणात कर्ज काढलेले आहे, असे जयंत पाटील म्हणाले. अजितदादांचा ‘एकनाथाला’ही दूर सारायचा प्लॅन कवितेचे वाचन झाल्यानंतर जयंत पाटील म्हणाले, मागच्या भाषणात अजितदादांनी तुकाराम महाराजांचे अभंग म्हटले होते. पण, यावेळी तुकोबांना दादांनी दूर केले आहे. आणि प्रश्न असा आहे की, अजितदादा तुकोबांपासून का दूर गेले? हरकत नाही. पण, तुकोबांबरोबर आता एकनाथांनाही दूर सारायचा प्लॅन तयार केलेला आहे, असा टोला लगावताना जयंत पाटील परफेक्ट टायमिंग साधले.

Share

-