संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीड बंद:लातूर जिल्ह्यातही मराठा समाज आक्रमक, केजमध्ये टायर जाळत निषेध

संतोष देशमुख यांच्या हत्येचे धक्कादायक फोटो बाहेर आल्यानंतर बीड आणि लातूरमध्ये लोकांच्या भावनांचा उद्रेक पाहायला मिळाला. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बीडमध्ये अपर जिल्हादंडाधिकारी यांनी 3 ते 17 मार्च या कालावधीसाठी मनाई हुकूम जारी केला आहे. त्यात संतप्त लोकांनी आज बीड जिल्हा बंदची हाक दिली आहे. सकाळपासून बंदच्या अनुषंगाने बाजारपेठा बंद ठेवून व्यापाऱ्यांकडूनही बंदला पाठिंबा देण्यात आला. दुसरीकडे संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ केजमध्ये नागरिक आक्रमक झाले. केजच्या धारूर चौकात टायर जाळून निषेध नोंदवण्यात आला. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याचीही मागणी केली. बीड शहरात संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ कडेकोट बंद पाळण्यात आल्याचे दिसत आहे. येथील व्यापाऱ्यांनी या बंदला उत्स्फूर्त प्रकारे सहभाग नोंदवला आहे. सामाजिक संघटनांनी रस्त्यावर उतरून बंदसाठी आवाहन केले होते. केज शहरात बंदला हिंसक वळण लागले. काही संतप्त समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात टायर पेटवून निषेध नोंदविला आहे. यावेळी धनंजय मुंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांना सहआरोपी करण्याची देखील यावेळी संतप्त नागरिकांकडून मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करतानाचे फोटो समोर आल्यानंतर लातूरमध्ये मराठा समाज आक्रमक झाला आहे. संतप्त झालेल्या तरुणांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात धनंजय मुंडे आणि आरोपींचे फोटो जाळून निषेध व्यक्त केला. यावेळी धनंजय मुंडे आणि आरोपींविरोधात जोरदार घोषणाबाजी करत या हत्येच्या घटनेतील आरोपींना फाशीची द्यावी, धनंजय मुंडे यांच्यावर खंडणीसह हत्येचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी होत आहे. धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला आहे. मात्र राजीनामा देताना त्यांनी तब्येतीचे कारण सांगितले आहे. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आमदारकीचा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आपला लढा चालू राहणार असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सोबतच धनंजय मुंडे हे वैद्यकीय कारणाने राजीनामा दिल्याचे म्हणतात. मात्र, त्यांना मन तरी आहे का, असा सवालही त्यांनी केला आहे.

Share

-