संतोष देशमुख हत्या प्रकरण:ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती; देशमुख कुटुंबीयांची मागणी मान्य

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्य सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः याबाबतची माहिती दिल. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी आपल्या विविध मागण्यासाठी मस्साजोग येथे ग्रामस्थांसोबत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या भूमिकेकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. ग्रामस्थांच्या मागण्यांमधील प्रमुख मागण्यांमध्ये उज्ज्वल निकम यांची सरकारी वकिल म्हणून नियुक्ती करण्याची मागणी होती. त्यानुसार आता राज्य सरकारच्या वतीने ही मागणी मान्य करण्यात आली आहे. या संबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.’ सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांच्याकडून स्वागत राज्य सरकारच्या वतीने उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीचे सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी स्वागत केले आहे. वकिल म्हणून त्यांचे काम खूप मोठे आहे. ते एक चांगले विधिज्ञ आहेत. तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे या निर्णयाचे स्वागतच करायला हवे असे देखील अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. मात्र ही साधी मागणी मान्य करण्यासाठी आंदोलन करावे लागले, हे दुर्दैव असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे. ग्रामस्थांचे आंदोलन सुरु बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला 78 दिवस उलटूनही आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन व फौजदार राजेश पाटील यांना बडतर्फ करून सहआरोपी करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी ग्रामस्थांनी काल पासून मस्साजोग येथील महादेव मंदिरासमोर धनंजय देशमुख यांच्यासह आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. या आंदोलनला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील उपस्थित राहत पाठिंबा दिला होता. तर या संदर्भात आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी उपोषण सोडवण्याची मागणी केली आहे. तसेच खासदार बजरंग सोनवणे हे देखील आज आंदोलकांची भेट घेणार आहेत. आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांच्या सात प्रमुख मागण्या