माझा राजीनामा महत्त्वाचा की, संतोष देशमुखांना न्याय देणे?:भगवान गडावरुन धनंजय मुंडेंचा प्रश्न; गड पाठिशी असल्याने आत्मविश्वास वाढल्याचा दावा
माझा राजीनामा महत्त्वाचा की, संतोष देशमुख यांना न्याय देणे महत्त्वाचे? असा प्रश्न मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. केवळ माझा राजीनामा घेऊन एका समाजाला किंवा मला टार्गेट करायचे असेल तर हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र, या घटनेत जे गुन्हेगार आहेत, त्यांना फासावर लटकवले गेले पाहिजे, हे माझे पहिल्या दिवसापासून मत असल्याचा दावा देखील धनंजय मुंडे यांनी केला आहे. आरोपाच्या घेऱ्यात अडकलेले धनंजय मुंडे हे कालपासून भगवान गडावर मुक्कामी होते. या दरम्यान गड त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचा दावा महंत नामदेव शास्त्री यांनी केला आहे. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत जे काही घडले ते सर्वांच्या समोर आलेले आहे. पहिल्या दिवसापासून संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना फासावर लटकवले पाहिजे, ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली गेली पाहिजे, ही माझी मागणी आहे. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्यातील कोणालाही सोडू नये, त्यांना शासन झालेच पाहिजे. ही आमची पहिल्या दिवसापासून भूमिका आहे. तरी देखील आजही काही जण राजकारण करत असतील, आणि त्यांचे राजकारण केवळ माझा राजीनामा घेण्या पुरते आहे की, संतोष देशमुख यांना खरा न्याय देण्यासाठी आहे? असा प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केला. मंत्री झाल्यानंतर भगवान गडावर दर्शनासाठी आला नव्हतो. त्यामुळे अनेक वर्षानंतर भगवान गडावर मुक्कामी आलो असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. मला सकाळी भगवान बाबांचे दर्शन घ्यायचे होते. त्यामुळे मी कालच येथे मुक्कामी आलो होतो. भगवानगड आल्यानंतर एक नवीन ऊर्जा मिळते. भगवान गडावर सकारात्मक वातावरण असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. भगवान बाबांनी माझ्या मागे शक्ती उभी केली असल्याचे देखील धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. बाबांनी माझ्या मागे शक्ती उभी केली बाबांनी माझ्यावर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले आहे. बाबांनी माझ्यावर एवढा मोठा विश्वास व्यक्त केला की, ही माझ्यासाठी खूप मोठी जबाबदारी असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. संकटाच्या, संघर्षात काळात भगवानगड माझ्या पाठीमागे उभा आहे. याच्याबद्दल नामदेव शास्त्री यांनी वाच्यता केली. ही माझ्यासाठी खूप मोठी शक्ती आहे. या शक्तीचे वर्णन मी शब्दात देखील करु शकत नाही. त्यांनी माझ्या मागे शक्ती उभी केली आहे, तेवढी जबाबदारी देखील माझ्यावर बाबांनी टाकली आहे. मी जातपात, धर्म न पाहता सर्व समाजातील लोकांची सेवा करतो. ती पुन्हा एकदा जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. गेल्या 53 दिवसापासून मला टार्गेट करण्याचा प्रयत्न माझ्यावरील संकट हे काही आज आलेले नाही. गेल्या 53 दिवसापासून इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडियावर मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या मध्ये मी कधीही एक शब्दही बोललेलो नाही. या 53 दिवसात मला कधीही भगवानगडावर येता आले असते. मात्र त्या भावनेतून येथे आलेलो नाही. आपण मंत्री झालो आहोत, आणि मंत्री झाल्यानंतर मला भगवानगडावर यायचे होते. बाबांचे दर्शन झाले की, शक्ती आणि प्रेरणा मिळते. तीच सर्वसामान्य व्यक्तींसाठी लढण्यासाठी, त्यांचे सेवा करण्यासाठी ताकद देत असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.