सरदेसाई वाड्यात छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, ‘छावा’ चित्रपटानंतर संगमेश्वरमध्ये वाढली पर्यटकांची गर्दी

छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलचा इतिहास जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांमध्ये निर्माण झाल्याचे दिसत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वर येथील सरदेसाई वादा येथे कैद करण्यात आले होते. हा वाडा पाहण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करत आहेत. मात्र वाड्याची दुर्दशा पाहून त्यांची निराशा होताना दिसत आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिवसृष्टी संदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. अमोल मिटकरी यांनी सभागृहात बोलताना संगमेश्वर येथील सरदेसाई वाड्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरदेसाई वाड्यात भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा केली आहे. छत्रपती संभाजी महाराज हे शौर्याचे प्रतीक आहेत. ते धर्मवीर, स्वराज्यारक्षक आहेत. सरदेसाई वाड्यात उचित प्रकारचे स्मारक उभारण्यात येईल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. अमोल मिटकरी यांच्या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, सरदेसाई वाड्यात छत्रपती संभाजी महाराज थांबले होते. हा वाडा अधिग्रहीत करून तेथे छत्रपती संभाजी महाराजांना साजेसे स्मारक उभारण्याकरिता राज्य सरकार पुढाकार घेईल. छत्रपती संभाजी महाराज हे शौर्याचे प्रतिक आहे. ते धर्मवीर, स्वराज्यरक्षक आहेत. सरदेसाई वाड्यात उचित प्रकारचे स्मारक उभारण्यात येईल. दरम्यान, संगमेश्वर येथील सरदेसाई वाडा छोटा आहे. तिथे फार जागा नाही. त्यामुळे सरदेसाई वाड्याच्या आजूबाजूला असलेली 100 एकर जागा अधिग्रहीत करून तिथे भव्य स्मारक उभारले जावे, अशी मागणी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी देखील या चर्चेदरम्यान केली आहे. यावर शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारक उभारण्याची घोषणा केलेली आहेच. त्यामुळे सरकारची समिती वाड्याची पाहणी करेल. गावकरी स्वतःहून जागा देण्यास तयार असतील तर ती विकत घेण्यासाठी सरकार पुढाकार घेईल. जर जागा मिळण्यात अडचण आली तर जिल्हाधिकाऱ्यांना जमीन अधिग्रहीत करण्यासंदर्भात निर्देश देण्यात येतील. पुढे बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, महाराष्ट्रात ठिकठिकाणी डिजिटल शिवसृष्टी, रायगड येथील पाचाड येथे असलेले राजमाता जिजाऊंचे समाधीस्थळ आणि बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथील जन्मस्थळ यांचाही विकास केला जाणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.