सरपंच ते आमदारकीची हॅट्ट्रीक:विधानसभा उपाध्यक्षानंतर आता मंत्रिपदी पहिल्यांदाच वर्णी, नरहरी झिरवाळ यांचा राजकीय प्रवास

महायुतीचा सरकार स्थापन झाल्याच्या 10 दिवसांनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. राष्ट्रवादीच्या 11 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी माजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची वर्णी लावली आहे. नरहरी झिरवाळ दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. जाणून घेऊयात सरपंच ते आमदारकीची हॅट्ट्रीक आणि आता मंत्री झालेल्या नरहरी झिरवाळ यांचा राजकीय प्रवास… नरहरी सीताराम झिरवाळ यांनी ग्रामीण भागातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. ते वनारे गावचे सरपंच होते. नरहरी झिरवाळ यांनी विविध कार्यकारी संस्थांचे संचालक, चेअरमन पदे सांभाळली आहेत. सुरुवातीच्या काळात बिगारी कामगार म्हणून काम
झिरवळ यांचे शिक्षण कला शाखेपर्यंत झाले आहे. परंतु झिरवळ यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यामुळे त्यांना सुरुवातीच्या काळात बिगारी काम करावे लागले होते. त्यानंतर दिंडोरी तहसील कार्यालयात लिपीक म्हणून ते कामाला लागले. परंतु, तेथील कामात मन न लागल्याने त्यांनी लिपिकाची नोकरी सोडली. त्यानंतर त्यांनी गावात शेतीची कामे सुरू केली. जनता दलातून राजकारणाला सुरुवात
जनता दलाचे माजी खासदार दिवंगत हरिभाऊ महाले यांच्या ते संपर्कात आले आणि जनता दलातून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी 1984 मध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली. त्यात ते विजयी झाले आणि वनारे गावचे सरपंच झाले. त्यांनी 1995 मध्ये जनता दलाकडून दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. परंतु, त्यावेळी त्यांचा पराभव झाला. विधानसभेतील या पराभवानंतर झिरवाळा यांनी 1997 साली जनता दलाकडून पंचायत समिती सदस्य, उपसभापती पदे भूषवली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2001 साली ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर जिल्हा परिषदेवर निवडून आले. त्यानंतर 2004 च्या विधानसभा निवडणुकीचं राष्ट्रवादीने त्यांना तिकीट दिले आणि ते विजयी झाले. 2009 मध्ये झाला निसटता पराभव
नरहरी झिरवाळ 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर पहिल्यांदा आमदार झाले होते. तेव्हा त्यांनी रामदास चारोस्कर यांचा पराभव केला होता. दिंडोरी मतदारसंघातून ते विधानसभेवर गेले होते. नंतर 2009 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. परंतु यावेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यांचा अवघ्या 149 मतांनी निसटता पराभव झाला होता. शिवसेनेच्या धनराज महाले यांनी त्यांचा पराभव केला होता. दिंडोरीतून सलग तीनवेळा आमदार
2009 विधानसभा निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता त्यांनी जोमाने काम केले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला. तेव्हापासून त्यांची विजयी घोडदौड काय आहे. 2014, 2019 आणि 2024 असे सलग तीन वेळा ते दिंडोरी मतदारसंघातून आमदार झाले आहेत. आता अजित पवारांनी त्यांना मंत्रिपदाची संधी दिली आहे. विधानसभा उपाध्यक्षपदी निवड
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात स्थापन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर झिरवळ यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. झिरवळ हे शरद पवार यांच्या जवळचे मानले जात होते. मात्र अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर झिरवळ शरद पवारांची साथ सोडली. मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून मारली होती उडी
नरहरी झिरवाळ आदिवासी बहुल भागातील जनतेचे ते प्रतिनिधित्व करतात. धगनर समाजाला देण्यात येणाऱ्या आरक्षणाला नरहरी झिरवाळ यांनी सत्तेत असूनही विरोध केला होता. धनगर समाजाला शासनाने आरक्षण जरूर द्यावे, त्याला आमचा कोणताही विरोध नाही. मात्र, आदिवासींचे आरक्षण कमी करून धनगर समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध असल्याचे झिरवाळ म्हणाले होते. यासाठी त्यांनी मंत्रालयात देखील आंदोलन केले होते. मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून सरंक्षण जाळीवर उडी घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत हिरामण खोसकर, किरण लहामटे, काशीराम कोतकर आणि खासदार हेमंत सावरा होते. हे आंदोलन चांगलेच गाजले होते.

Share

-