शाहीर वसुधा कल्याणकर आणि अमरजित बाहेती यांना पुरस्कार,:कॉ. कुसुमताई गायकवाड स्मृती पुरस्कार, नाशिक येथे वितरण सोहळा
महिला दिनानिमित्त शाहिरी व महिला चळवळीत काम करणाऱ्या वसुधा कल्याणकर व अमरजित बाहेती यांना स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड कुसुमताई माधवराव गायकवाड स्मृती पुरस्कार देऊन नाशिकच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध कांदबरीकर राकेश वानखेडे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. भारतीय महिला फेडरेशन, आयटक नाशिक व स्वातंत्र्यसैनिक माधवराव गायकवाड बहुउद्देशीय संस्था नाशिक वतीने पुरस्कार वितरण व लढणाऱ्या स्त्रियांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. २०२५ चा स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड कुसूमताई माधवराव गायकवाड स्मृती पुरस्कार परिवर्तनवादी चळवळीत कार्यरत शाहीर वसुधा कल्याणकर व शाहीर अमरजित बाहेती यांना रोख रक्कम १५ हजार रूपये, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. मोलकरीण, बांधकाम कामगार, स्त्रियांचाही यावेळी स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड माधवराव गायकवाड बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्षा साधना गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ परिवर्तनवादी चळवळीचे नेते करूणासागर पगारे होते. प्रमुख अतिथी म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्ष नेते महादेव खुडे, आयटकचे जिल्हाध्यक्ष व्ही. डी. धनवटे, राज्य सचिव राजू देसले उपस्थित होते. कॉ. कुसुमताई गायकवाड यांच्या स्मृतीनिमित्त पुरस्कार प्रदान करताना राकेश वानखेडे. शेजारी पुरस्कारार्थी.